लोकमत न्यूज़ नेटवर्क
जळगाव : रामेश्वर कॉलनीतील एकनाथ नगर येथील सिताराम देला राठोड या मजूराचे बंद घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत कपाटातील ३ लाख ७० हजाराची रोकड लांबविल्याची घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुरूवारी रात्री उशिरा एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी प्लॉट विक्री केले होते. त्याची ही रक्कम होती, अशी माहिती राठोड यांनी ''लोकमत'' ला दिली.
एकनाथ नगरात सिताराम देला राठोड हे कुटुंबियांसह राहतात. दोन महिन्यापूर्वी त्यांनी स्वत: चे प्लॉट विक्री केले होते. त्याची ३ लाख ७० हजार रूपये रक्कम त्यांना मिळाली होती. दरम्यान, ५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता ते भावाकड़े घराला कुलुप लावून गेले होते. दुसऱ्या दिवशी गुरूवारी ६ मे रोजी सकाळी ८ वाजता घरी आले असता त्यांना घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडलेला दिसून आला. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री बंद घर फोडून घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले ३ लाख ७० हजार रूपयांची रोकड लांबविल्याचे दिसून आले. घरात चोरी झाल्याचे समोर येताच त्यांनी पोलिसात धाव घेत पोलिसांना माहिती सांगितली. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सिताराम राठोड यांच्या फिर्यादीवरून गुरूवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहे.