राजेश नगरातील एका अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर अर्चना अरुण तारे यांचे निवासस्थान आहे. ते बऱ्हाणपूर येथे गेल्याचा फायदा घेत घराला लावलेल्या कुलपावर चोरट्यांची करडी नजर असावी. त्यांनी दरवाजाचा कडी-कोंडा तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश करीत कपाटातील २० हजार रुपये रोख, सोन्याच्या बांगड्या व इतर साहित्य लांबविले.
वेल प्लान गेम
या चोरीची वेल प्लान गेम करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून, चोरट्यांनी आजूबाजूच्या, शेजारांच्या घरांना चोरी करण्याच्या आधी कड्या लावल्या होत्या. जेणेकरून आवाज जरी आला तरी चोरी करताना पकडले जाऊ नये.
बंद अपार्टमेंट चोरट्यांच्या रडारवर
कामानिमित्त कोण कुठे गेले आहे याची खातरजमा केल्यानंतर विशेषत: बंद अपार्टमेंट ही चोरट्यांच्या रडारवर असल्याचे आजच्या घटनेने दिसून येत असून, शहरातील समृद्धी पार्कमधील अपार्टमेंटमधील अनिल धांडे हे पुण्याला कामानिमित्त गेल्यानंतर त्यांच्याही फ्लॅटला कुलूप असल्याने चोरट्याने संधी साधली व त्यांच्या घरीही घरफोडी केली. या घटनेत किती मुद्देमाल चोरीला गेला हे कळू शकले नाही.
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सपोनि मंगेश गोठला, पो.कॉ. ईश्वर भालेराव, विकास सातदिवे, होमगार्ड योगेश सोनवणे यांनी घटनास्थळी पाहणी केली. या घटनेतही श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते.