जळगाव : गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी यावल-विदगाव एसटीत चढणा-या रेखा धनंजय महाजन (रा.दहीगाव, ता. यावल) व प्रतिभा जयप्रकाश चौधरी (रा. डांभोर्णी, ता.यावल) या प्रवासी महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगळपोत लांबविली़ ही घटना जळगाव नवीन बसस्थानकावर सोमवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जळगाव नवीन बसस्थानकावर चोरट्यांनी उच्छाद मांडला असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.दहीगाव येथील रेखा महाजन व त्यांचे पती धनंजय महाजन हे २६ डिसेंबर रोजी नाशिक येथील घराच्या पूजेसाठी गेले होते़ घराची पूजा आटोपून महाजन दाम्पत्य सोमवारी सकाळी ६ वाजता जळगावसाठी नाशिकहून निघाले. नंतर दुपारी १२ वाजता जळगाव नवीन बसस्थानकावर पोहोचले. दहीगाव जाण्यासाठी यावल-विदगाव एसटी बस फलाटावर लागली असता बसमध्ये चढताना खूप गर्दी झाली. या गर्दीसोबतच महाजन दाम्पत्य बसमध्ये चढले. त्यानंतर सीटवर जावून बसताच, रेखा महाजन यांच्या गळ्यातील पोत तुटून पडली. त्यावेळी दहा हजार रूपये किंमतीची पोत व दोन सोन्याच्या वाट्या कुणीतरी चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले.आणखी एका महिलेची पोत तोडली...रेखा महाजन यांना पोत तुटल्याचे कळल्यानंतर वाट्या शोधत असताना, बसमधील प्रतिभा जयप्रकाश चौधरी या प्रवासी महिलेने सुध्दा तिची पोत कुणीतरी तोडल्याचे सांगितले. दोन्ही प्रवाशांनी पोत शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, गर्दीचा फायदा घेवून अज्ञात चोरट्याने ती चोरून नेल्याची खात्री झाली.प्रवासी महिलांनी गाठले पोलीस ठाणेसोन्याची पोत व मणी चोरीला गेल्यानंतर लागलीच महाजन व चौधरी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले. नंतर पोलिसांना सर्व हकीकत सांगितले. त्यानंतर रेखा महाजन यांचे दहा हजार रूपये किंमतीची पोत व वाटी तसेच प्रतिभा चौधरी यांचे २० हजार रूपयांची सोन्याची पोत चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.