‘कापूसकोंडय़ाची गोष्ट’ किती जणांना आठवतेय? ािस्तपूर्व काळ या धर्तीवर बोलायचं तर ‘इंटरनेट’पूर्व काळातली ती गोष्ट आहे. तो एक प्रकारचा खेळ होता. एखाद्याला विचारायचं, ‘‘तुला कापूसकोंडय़ाची गोष्ट सांगू?’’ आणि मग त्यावर तो काहीही बोलला किंवा न बोलला, तरी परत परत तेच विचारायचं, ‘‘कापूसकोंडय़ाची गोष्ट सांगू?’’ ऐकणारा पार ‘किर्र’ होईर्पयत असं विचारतच रहायचं.. प्रत्यक्ष गोष्टीला सुरुवात कधी होतच नाही! कारण अशी कोणतीही ‘गोष्ट’ प्रत्यक्षात कधी नसतेच. समोरच्याचं डोकं फिरवण्यासाठी ते नाव फक्त पुन्हा पुन्हा घेतात. थोडक्यात काय, तर काहीही विचार नसलेली, मुद्दा नसलेली किंबहुना ‘गोष्ट’सुद्धा नसलेली अखंड वटवट म्हणजे कापूसकोंडय़ाची गोष्ट.
मला लहानपणी फार कुतूहल होतं, की हा कापूस कोंडय़ा नक्की कुठे असतो? त्याची गोष्ट नक्की कशाबद्दल आहे? वगैरे वगैरे.. मोठेपणी, अलीकडेच हे कोडं उलगडलं. कापूसकोंडय़ा दिसला कधीच नाही, पण त्याचा वावर कुठे असतो ते मात्र समजलं. चाणाक्ष वाचकांनी ओळखलं असेलच.. पण जाऊ द्या, उगाच डोक्याला ताण नको. मीच सांगून टाकतो. 24 तास बातम्यांचा रतीब अदृश्य रूपाने वावरत असतो. कारण त्याचीच गोष्ट सांगायला सगळे चर्चावीर एकत्र जमलेले असतात. मोठमोठय़ाने, तावातावाने, घशाच्या शिरा ताणून ते सूत्रसंचालकाला, एकमेकांना आणि प्रेक्षकांना या कापूसकोंडय़ाची गोष्ट तर सांगत असतात. आठवून बघा. कितीही तास चर्चा- महाचर्चा चालली चालली तरी ती (एकदाची) संपल्यानंतर फक्त अध्र्या तासाने आपण प्रेक्षकांनी आठवण्याचा प्रय} केला की, थोडय़ा वेळापूर्वी आपण काय ऐकलं? तर काही म्हणता काही लक्षात रहात नाही. फक्त कुणीतरी चष्मीष्ट बुवा किंवा बाई, ‘‘मला.. मला.. मला.. मला. असं म्हणायचंय-’’ असं तार सप्तकात बोलताहेत, आणि त्याचवेळी इतर सर्व भिडू प्रचंड गदारोळ करून आपापलं सप्तक लावताहेत, एवढंच लक्षात रहातं. जो-तो आपापल्या परीने आपापली कापूसकोंडय़ाची गोष्ट सांगत असतो.
गोष्टीला विषय कोणताही- अक्षरश: कोणताही चालतो. कोणीतरी लहान मुलगा खेळताना बोअर-वेलच्या खड्डय़ात पडला.. कोणत्याही सुमार नटीचा झगा एखाद्या फिल्मी पार्टीत टरकला.. कोणातरी अति श्रीमंत, लाडावलेल्या कार्टीने तुफान दारू पिऊन तुफान वेगाने गाडी चालवून धडकावली.. एखाद्या ‘बोल्ड’ वगैरे नटीने अंगावरल्या कपडय़ांबद्दल असलेल्या आपल्या अॅलर्जीची लागण इतरांना केली.. एखाद्या (इंग्रजीत लिहिणा:या) देशी लेखिकेने हलाहल पचवणा:या शंकराच्या आवेशात ‘मी आता बीफ खाणार आहे’ म्हणून घोषणा केली.. इथपासून ते थेट- अमेरिकेच्या लोकांनी हिलरीबाईंच्या ऐवजी ट्रंप साहेबाला निवडून दिलं.. ओबामाने पाकिस्तानला न विचारता, ओसामा बिन लादेनला मारलं.. कोणत्यातरी जागतिक विचारवंताने आपण ‘गे’ असल्याची घोषणा केली.. इथर्पयत, कोणताही विषय असला, तरी चालतोय की! बघता बघता मिठाईवर माशा जमाव्यात, तसे नेहमीचे यशस्वी चर्चावीर वाहिन्यांवर जमा होतात. आणि ‘एक, दोन..साडे-माडे तीन!’ म्हटलं की, कापूस कोंडय़ाची गोष्ट सुरू होते. ज्या फालतू विषयांवरच्या चर्चेने समाजाचा काडीचाही फायदा होणार नाहीये, आणि ज्या विषयांवरची यांची बडबड संबंधितांर्पयत आयुष्यात कधी पोहोचणार नाहीये, अशा विषयांवर चाललेलं चर्चेचं गु:हाळ किती चालवावं, याला काही सुमार?
या कापूसकोंडय़ाचा कापूस नीट पिंजला जातोय की नाही, याकडे सूत्रसंचालक जातीने लक्ष ठेवून असतात. कोणीही कोणालाही पूर्ण बोलू देणार नाही, आणि कोणीही कोणाचंही म्हणणं नीट ऐकून घेणार नाही, याची संपूर्ण खबरदारी चर्चेच्या दरम्यान घेतली जाते. सगळ्यात जास्त आरडा-ओरडा करणा:या आणि सगळ्यात बेअकली विधानं करणा:या भिडूला अगदी आवजरून निमंत्रण असतं! सवाल टी.आर.पी.का है भाई! आताचंच बघा ना- राष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर झालाय. आता वाहिन्या- वाहिन्यांवर कापूसकोंडय़ाच्या गोष्टी सुरू होतील. घनघोर चर्चा होतील. ‘कुठेही जाऊ नका.. आम्ही लगेच परत येतोय,’ असा गोड दम दिला जाईल.. एन्जॉय!-ते जाऊ द्या.. कापूसकोंडय़ाची गोष्ट सांगू?
-अॅड.सुशील अत्रे