लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : मोठा गाजावाजा करून सात्रीत आलेल्या आपत्ती व्यवस्थापन पथक, प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या पथकाने गावाकडे तिसऱ्याच दिवशी पाठ फिरविली. आई-वडिलांचा आधार गमावलेल्या चिमुकल्या वर्षाच्या मदतीला गावच धावले आणि तिला खासगी बालरोग तज्ज्ञांकडे दाखल करण्यात आले आहे.
आरुषीच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर आरोग्य पथक, एसआरडीएफ पथक नावेत बसून सात्री येथे नदी ओलांडून पोहोचले. सारे गावच व्हायरल इन्फेक्शनने आजारी पडल्याने डॉक्टरांनी सुमारे अडीचशे रुग्ण तपासले. संध्याकाळ झाली, नाव रात्री उतरवता येणार नाही म्हणून पथक माघारी परतले. त्यावेळी ७० रुग्ण तपासण्याचे शिल्लक होते. तिसऱ्या दिवशी ना नाव आली, ना प्रशासन आले, ना डॉक्टर आले.
डॉक्टरांनी तपासलेल्या वर्षा पांडुरंग बोरसे (वय ७) या मुलीची तब्येत बिघडली. आईचे निधन झालेले. वडील जन्मताच दोन्ही पायांनी दिव्यांग. ६५ वर्षांची भूमिहीन आजी मजुरी करून घर भागवते. इलाज कसा करणार म्हणून सात्री गावचे ग्रामस्थ एकवटले आणि तिला खाटेवर टाकून अमळनेर येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. शरद बाविस्कर यांच्या दवाखान्यात दाखल केले. डॉ. बाविस्कर यांनी तिला लिव्हरला सूज, टायफाईड आणि कफचा खूप त्रास असल्याचे सांगितले. तिच्यावर मोफत उपचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अखेर गावकऱ्यांनीच डांगरी येथील डॉक्टर आर. डी. पाटील यांना पारंपरिक पद्धतीने खाटेवर नदी पार करून गावात नेले. त्यांनी उर्वरित रुग्णांना तपासले, तर काही ग्रामस्थ शेतांमधून पायी चालत निंभोरा येथे जाऊन उपचार घेऊन आले.
दाऊदी बोहरा समाजातर्फे आदिवासी मुलींना फ्रॉकचे वाटप
दाऊदी बोहरा समाजातर्फे सात्री येथील पूरग्रस्त आदिवासी मुलींसाठी पन्नास फ्रॉक, स्कर्ट, टॉप व गोधडी माजी सरपंच महेंद्र बोरसे यांना सुपूर्द करण्यात आले. मेहराज बोहरी व शिरीन करमपूरवाला यांनी ते दिले. याप्रसंगी दाऊदी बोहरा समाजातर्फे रशिदा बोहरी, समिना बुर्हानी, मकसूद बोहरी, गिरीश बडगुजर, आदी उपस्थित होते.