उटखेडा, ता.रावेर : येथील सरस्वती विद्या मंदिर हायस्कूलच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी अज्ञात पाच चोरट्यांविरूद्ध रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे . आजवर पैशांची चोरी, गाड्यांची चोरी झाल्याचं ऐकलं आहे, तसेच एटीएम मशीन चोरीच्या घटनाही घडल्या आहेत. पण आता सुरक्षाव्यवस्थेचा तिसरा डोळा ओळखला जाणारे सीसीटीव्ही कॅमेरे चोरीला गेल्याचे उघड झाले आहे . चोरणारी गँग ग्रामिण भागात सक्रिय झाली असून या टोळीने सीसीटीव्ही कॅमेरे उखडून न्यायला सुरुवात केली आहे. चोरी रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे किंवा अद्यावत सुरक्षायंत्रणा लावून आपण कितीही काळजी घेतली तरी काही शहाणे चोर चोरी करून कधी पोबारा करतील याचा थांगपत्ताही आपल्याला लागायचा नाह . गत मार्च महिन्यापासून संपूर्ण जग कोरोनाच्या जागतिक महामारीने होरपळून निघालेले आहे . त्याला शिक्षणक्षेत्र देखील अपवाद नाही . मागील आठ महिन्यांपासून सर्व शैक्षणिक संस्था बंद आहेत . याचाच फायदा घेत उटखेडा येथील हायस्कूलमध्ये चोरीची घटना घडली आहे . हायस्कूलमधील तीन कॅमेरे चोरीला गेल्याचे उघडकीस आले . सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर कार्यालयामध्ये होता . या डिव्हीआरमधील फुटेज हायस्कूलच्या शिक्षकांनी तपासले असता त्यात पाच जण हायस्कूलमध्ये येत असल्याचे दिसून आले . या चोरट्यांनी कॅमेरे लंपास केले . या प्रकरणी हायस्कूलचे मुख्याध्यापक ललित चौधरी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात पाच चोरांच्या विरूद्ध गुन्हा नोदविण्यात आला .
सुरक्षाव्यवस्थेचाच चोरला ‘तिसरा डोळा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 5:31 PM