जळगाव : जिल्ह्यात ३५ पोलीस ठाण्यांसह शहर वाहतूक शाखा आदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे पोलीस दलाचा तिसरा डोळा म्हणून भूमिका बजावत आहे. काही ठिकाणी जिल्हा नियोजन मंडळ तर काही ठिकाणी मानव संसाधन विभागाच्या माध्यमातून कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालय देखील सीसीटीव्हीच्या नजरेत आहे.
जळगाव शहरातील सर्व सहा पोलीस ठाण्यांसह गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरही पोलीस दलाकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. जिल्हा नियोजन मंडळाकडून त्यासाठी निधी मिळाला होता. प्रत्येक पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे सक्तीचे करण्यात आले होते, त्यापार्श्वभूमीवर हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पोलीस ठाण्यांसह सर्वच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयातही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत.