जळगाव : महिलांसाठी राखीव असलेल्या येथील भादली गावातून प्रभाग क्रमांक चारमधून अंजली पाटील (जान अंजली गुरू संजना) या तृतीयपंथीयाने अर्ज भरला होता. हा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नाकारला. मात्र तेथूनच सुरू झाली अंजलीच्या संघर्षाची आणि शमिभाच्या साथ देण्याची खरी कहाणी. या दोघींनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज केला आणि निवडणूक लढण्याचा अंजलीचा मार्ग मोकळा झाला.
२०१५ च्या ग्रामपंचायत निवडणुकीतही अंजलीने अर्ज भरला होता. त्यावेळी हा प्रभाग सर्वसाधारण गटात राखीव असल्याने तिला निवडणुकीस अडचण आली नव्हती. मात्र यंदा प्रभाग राखीव झाला आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आयोगाच्या २०११ च्या एका पत्रकाचा आधार घेत अर्ज रद्द केला. त्यावेळी निराश झालेल्या अंजली यांनी शमिभा यांना फोन केला. शमिभा या वंचित बहुजन आघाडीच्या युवा जिल्हाध्यक्ष आणि युवा आणि महिला प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत. शमिभा अंजलीच्या मागे उभ्या राहिल्या. त्यांनी तहसीलदार नामदेव पाटील आणि आमदार सुरेश भोळे यांच्याशीही चर्चा केली. मात्र त्यांचे समाधान होत नव्हते. निवडणुकीशी संबधित याचिका असल्याने ती उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्याचा निर्णय घेतला.तिसऱ्या महिला आयोगाने शासकीय आरोग्य आणि सुरक्षा सोयी सवलती या तृतीयंपंथीयांना महिलांप्रमाणेच देण्यात याव्यात. तृतीयपंथीयांना महिलांच्या श्रेणीत मोडले जावे. २०१९ च्या कायद्यानुसार १८ वर्षे पूर्ण झालेली व्यक्ती आपले लिंग निश्चित करु शकते. यासह इतर मुद्दे त्यांनी मांडले होते.