आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २३ - जिल्हा रुग्णालयात मृतहेद ठेवण्यासाठी असलेल्या तीन शीतपेट्यांपैकी (कोल्डस्टोरेज) सुरू असलेली एकमेव शीतपेटीही चार दिवसांपासून बंद पडल्यामुळे शवविच्छेदनासाठी आणलेले मृतहेद उघड्यावर ठेवावे लागत आहे. यामुळे मृतदेहांची अवहेलना होत असल्याचा प्रकार जिल्हा रुग्णालयातच घडत आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज चार-पाच मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाते. तसेच बेवारस सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी तीन दिवसांपर्यत मृतदेह याठिकाणी ठेवावे लागतात. त्यासाठी शवविच्छेदनगृहात तीन शीतपेट्या बसविण्यात आल्या. यातील दोन कोल्डस्टोरेज मशिन गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहेत. त्यात आता तिसरे मशिनदेखील बंद पडले आहे. यामुळे या परिसरात दुर्गंधीही पसरत आहे. या संदर्भात शवविच्छेदनासाठी आणलेले मृतदेह शवविच्छेदनगृहात उघड्यावर ठेवावे लागत असल्याची माहिती शवविच्छेदनगृहातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना कळविली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले जात आहे.बंद पडलेल्या मशिन दुरुस्ती करण्यासाठी संबंधित कंपनीसोबत देखभाल दुरुस्तीसाठी करार करण्यात आलेला आहे. मात्र कंपनीकडून गेल्या तीन वर्षात मशिनची देखभाल दुरुस्ती झालेली नसल्याने अडचणी वाढत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.शवविच्छेदन गृहातील मशिन दुरुस्तीकरण्यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून पत्र देण्यात आलेले आहेत. संबंधित कंपनीतील कर्मचारी मशिनची तपासणी करण्यासाठी आले होते. त्यांच्याकडून मशिनची तपासणी केली असता यातील गॅस संपलेला असल्याचे सांगीतले होते. परंतू अद्यापदेखील या मशिनमध्ये गॅस भरलेला नसल्याने या मशिन बंद स्वरुपात असल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासन व कंपनीकडून हलगर्जीपणा केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.