कोरोनाबाधित झालेल्या लहान मुलांमध्ये साथ आजाराची फारशी लक्षण नसतात. त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असते. मात्र, त्यांचा संपर्क टाळला पाहिजे. लहान मुलांना क्वारंटाइन करणे शक्य नाही. अशावेळी घरातील वयोवृद्ध व्यक्तींनी त्यांच्यापासून लांब राहणे आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेतील लहान मुलांवरील कोरोनाचे सावट रोखायचे असल्यास १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने होण्याची गरज आहे. लसीकरण झालेल्या व्यक्ती पुढे कोरोना झालेल्या लहान मुलांच्या सानिध्यात आल्या, तरी त्यांना कोरोना होण्याचा धोका कमी असेल. पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे लहान मुलांना फ्ल्यू प्रतिबंधक लस देणेही योग्य होईल. कोरोना व फ्ल्यू यांची लक्षणे जवळपास सारखीच आहेत. फ्ल्यूची लस दिल्यास डॉक्टरांसाठी उपचार करणे सोपे होईल. लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्याचाही विचार प्राधान्याने झाला पाहिजे. लहान मुले कोरोनाबाधित झाल्यास पालक त्याचा सीटीस्कॅन करण्याचा हट्ट धरतात किंवा सीटीस्कॅन करूनच रुग्णालयात येतात. यामुळे इतर आजार उद्भवण्याची शक्यता अधिक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचारही घेतले पाहिजेत. कोरोनावरील प्रचलित औषधींची लहान मुलांना एवढी गरज नसते. त्यामुळे पालकांनी याचाही आग्रह टाळला पाहिजे.
-डॉ. गिरीष शिवचंद्र मुदंडा
बालरोगतज्ज्ञ, चाळीसगाव.