बोदवड : तालुक्यात ३१ हजार हेक्टर जमीन पेरणीयोग्य असून, तालुक्यात साधारणपणे पर्जन्यमान आठशे मिमी असते; परंतु गेल्या तीन वर्षांपासून तालुक्यात सहाशे मिमीच्या आत पाऊस होत आहे. यंदा पर्जन्यमान चांगले असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकरी पावसाची वाट पाहत आहे.
गतवर्षी ३१ ऑगस्टअखेर तालुक्यात चारशे नव्वद मिमी पाऊस झाला होता. दरम्यान, तालुक्यात सर्वाधिक कापसाची लागवड केली जाते. एकतीस हजार हेक्टर लागवडयोग्य जमिनीपैकी पाच हजार हेक्टर जमीन बागायत असून, यात एकूण जवळपास १७ हजार हेक्टरवर कापसाची लागवड केली. नऊ हजार हेक्टरवर मका, त्यापाठोपाठ ज्वारी, तूर, बाजरी, हरबरा व इतर कडधान्य ज्यात उडीद, मूग, चवळी, भुईमूग या पिकाची लागवड केली जाते.
बागायत कापसाची लागवड लवकरच पूर्ण होणार
यंदा १० जून रोजीपर्यंत फक्त पाच हजार हेक्टर बागायत जमिनीपैकी फक्त दोन हजार नऊशे हेक्टरवर बागायत कापसाची लागवड केलेली असून, उर्वरित बागायत कापसाची पूर्ण लागवड येत्या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
पाच टक्के पेरण्या...
कोरडवाहूच्या २६ हजार हेक्टर क्षेत्रावर अद्याप अर्थात १० जून उलटूनही पेरणी झालेली नाही तर शेतकरी वर्गाने शेत तयार ठेवले असून, ६ जूनला पावसाने हजेरी लावली आहे. आजपावेतो तालुक्यात यंदा चाळीस मिमी पाऊस झाला आहे,
तर दमदार पावसाअभावी तालुक्यात पेरण्या खोळंबल्या असून, तालुक्यात १० जूनपर्यंत फक्त पाच टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
पेरणीची घाई न करण्याचे आवाहन
तालुका कार्यालय कृषी अधिकारी चौधरी यांची प्रतिक्रिया घेतली त्यांनी सांगितले की, जमिनीत चांगली ओल झाल्याशिवाय पेरणी करू नये. यंदाही तालुक्यात कापसाची पेरणी १५ हजार हेक्टरच्यावर जाईल अशी स्यिती बाजरातील बी-बियाणे खरेदीवरून लक्षात येते.