अमळनेर : तब्बल ३७ वर्षांनंतर लोटा बाडगी पाझर तलाव बांधला गेला असून, प्रथमच त्यात पाणी अडविले गेल्याने परिसरातील गावातील शेतीला सिंचनाचा फायदा होणार आहे.
१९८४ पासून माजी आमदार स्मिता वाघ, स्व. उदय वाघ व रणाईचे, डांगर, अंचालवाडी, सातरणे परिसरातील शेतकऱ्यांनी लोटा बाडगी पाझर तलावाचे काम करून सिमेंट बंधारा बांधण्याची मागणी करण्यात आली हाेती. २००८ मध्ये त्याला मंजुरी मिळाली, मात्र शेतकऱ्यांच्या भूसंपादनाची अडचण आल्याने काम बंद पडून निधी परत गेला होता. अखेरीस माजी आमदार वाघ यांच्या मागणीला तत्कालीन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी बंधारा मंजूर केला. कामाला सुरुवात झाली. त्यांनतर त्या कामाला विद्यमान आमदार अनिल पाटील यांनीही चालना दिली. नुकतेच काम पूर्ण झाले असून, प्रथमच पावसाळ्यात पाझर तलाव पूर्ण भरून सिमेंट बंधाऱ्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे.
पांझरा नदीचे वाया जाणारे पाणी माळीण नदीत उतरवून ते विविध नाल्यांत व धरणात सोडल्यास शेतकऱ्यांना बागायती पिके घेता येतील. नदी जोड प्रकल्प झाल्यास पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो.
हा बंधारा जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन पाटबंधारेअंतर्गत असून, भूसंपदानासह प्रकल्पाची किंमत १ कोटी २० लाख रुपये असून, साठवण क्षमता १३७.४४ सहस्र घनमीटर पाणी साठा झाला असून, अप्रत्यक्ष सिंचन क्षमता सुमारे ५३ एकर आहे. बुडीत क्षेत्र १२.२० हेक्टर आहे. सांडवा लांबी ३४ मीटर आहे, तर धरणाची लांबी ८७० मीटर आहे.
---
या परिसरात नदी जोड प्रकल्प राबविल्यास परिसरातील बंधारे, धरण परिपूर्ण भरले जातील त्यातून सिंचन आणि पाणीपुरवठा योजनांसाठी फायदा होईल - स्मिता वाघ, माजी आमदार
लघु सिंचनाचे सर्व प्रलंबित प्रकल्प हळूहळू पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. कमी खर्चात अप्रत्यक्ष सिंचन होऊन जमिनीची पाण्याची पातळी वाढणार आहे.
- अनिल पाटील, आमदार अमळनेर
२५/८