भूपेंद्र मराठेजळगाव : "जनतेचे प्रेम पाहून आम्हाला काम करण्याची ऊर्जा प्रेरणा मिळते, काही लोकं म्हणतात सरकार पडणार. पण हे बहुमताचे सरकार आहे. आपल्याकडील आमदार टिकून रहावेत, यासाठी विरोधकांकडून अशी हूल उठविली जात आहे," असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना हाणला आहे. तुम्ही जितके आरोप कराल त्याच्या दुप्पट आम्ही काम करू असं वक्तव्यही त्यांनी केलं.
पारोळा येथील एनईएस हायस्कूलच्या प्रांगणात गुरुवारी सायंकाळी विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी आयोजित जाहीर सभेत त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढविला आणि आपल्या सरकारच्या कामाची माहिती दिली. ते म्हणाले की, "सरकार सर्वसामान्य लोकांच्या जीवनात आनंद देणारे असावे. हे काम आपण करतोय, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी असा कोणताही घटक आम्ही वंचित ठेवणार नाही. हे लोकांच्या मनातलं, लोकांच्या प्रश्नांना न्याय देणारे सरकार आहेआम्ही लोकांसाठी काम करत असतो. लोकांना वाटतं हे सरकार आपलं आहे, मुख्यमंत्री आणि सगळे मंत्री आपले आहेत. या ठिकाणी असलेली गर्दी हीच कामाची पोचपावती आहे." "पुढील काळातही सरकार सकारात्मक निर्णय घेईल," असा विश्वास देत ते म्हणाले की, "उपमुख्यमंत्री यापूर्वी मुख्यमंत्री होते, त्यांच्याही अनुभवाचा फायदा सरकारला होत आहे. कापसासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करु. कापसाला जो भाव मिळाला पाहिजे, त्यासाठी हे सरकार प्रयत्न करेल. आपलं सरकार येऊन सहा सात महिने झाले. अस्तित्वाची लढाई सुरू होते तेव्हा वैयक्तिक स्वार्थ बाजूला पडतो. म्हणून आम्ही क्रांती घडवली, उठाव केला. बाळासाहेबांची शिवसेना रक्ताचे पाणी करून उभी केली आहे," असं ते म्हणाले. खोके दिले पण जनतेसाठी लोक आरोप करतात, त्यांच्याकडे दुसरा शब्द नाही. गुलाबराव पाटील यांना आपण आज २०० तर चिमणराव यांना ११५ खोके दिले. पण ते घरात ठेवण्यासाठी नाही तर जनतेसाठी, जनतेच्या कामांसाठी दिल्याचे ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. आमदार चिमणराव पाटील व जिल्हा बॅंक संचालक अमोल यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.