लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : यावल तालुक्यातील आसराबारी येथील एका आठ महिन्याच्या बालकाच्या मृत्यूनंतर यंत्रणा त्या पाड्यावर पोहोचली आहे. या पाड्यावरील दुर्लक्षित बालकांची अखेर वड्री अंगणवाडीत नोंद घेण्यात आली आहे. या ठिकाणी मिनी अंगणवाडीची मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. दरम्यान, या वाढीव कुपोषित बालकांसाठी आहाराची मागणी नोंदविण्यात आली आहे; मात्र हा आहार अद्यापपर्यंत आलेला नसल्याची माहिती आहे.
याबाबत चौकशी समितीने चौकशीही केली आहे; मात्र आरोग्य विभागाकडून अद्याप याचा सुस्पष्ट अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याकडे सोपविण्यात आलेला नाही. आसराबारी येथे कुठलीच यंत्रणा पोहोचली नसल्याचे वास्तव बालकाच्या मृत्यूनंतर समोर आले होते. त्यानंतर तीन विविध पातळ्यांवर या सर्व प्रकरणाची चौकशीही करण्यात आली. यात सात अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवून त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यांचे खुलासेही सादर झाले; मात्र याबाबत अंतिम अहवाल आरोग्य विभागाकडेच पडून असल्याची माहिती आहे.
कर्मचारी कमतरता
आसराबारी या पाड्यावर आरोग्य शिबीर घेण्यास मनुष्यबळ कमतरतेची मोठी अडचण असल्याचे सांगितले जात आहे. यात सीएचओ तसेच आरोग्यसेवक नसल्याची माहिती आहे. यासह बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांच्याकडेही या पदाचा प्रभारी पदभार आहे. त्यामुळे तालुक्यात गंभीर परिस्थिती असल्याचे चित्र कायम आहे. दोन महिने उलटून अद्यापही वाढीव कुपोषित बालकांना पोषण आहार मिळाला नसल्याची गंभीर बाब समोर येत आहे.
कोट
या भागात मिनी अंगणवाडीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. सद्यस्थितीत वड्री अंगणवाडी अंतर्गत या बालकांची नोंद करण्यात करण्यात आली आहे. - देवेंद्र राऊत, महिला व बालकल्याण अधिकारी जि. प.