जळगाव : जिल्हा परिषदेतील प्रशासकीय व विनंती बदल्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने बदलीसाठी दिव्यांगाचे बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिला आहे. यासह एकाच विभागात पाच वर्षे झालेल्यांची माहितीही मागविण्यात आली असून त्यांच्याही बदल्या करण्यात येणार आहेत.
बदलीत दिव्यांगांना प्राधान्य असते, मात्र, यासाठी त्यांना प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते, मात्र, बहुतांश वेळा काही कर्मचारी हे बोगस प्रमाणपत्र सादर करत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. यामुळे मूळ दिव्यांगांवर अन्याय होत होता. दरम्यान, या प्रमाणपत्रांची जिल्हा परिषदेकडून पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे. त्यात दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांना निलंबित करण्यात येऊ शकते, शिवाय तक्रारींचीही चौकशी होणार आहे. दरम्यान, अनेक कर्मचारी बदली होऊन देखील प्रतिनियुक्तीवर जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये ठाण मांडून आहेत. त्यांची माहिती आता प्रशासनाकडून घेतली जात आहे.