एरंडोल : अरबी समुद्रातील नियोजित छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासंदर्भात ज्यांनी गाजावाजा केला त्यांनी पाच वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे केले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील आम जनतेचा भ्रमनिरास झालेला आहे. त्यांना या निवडणुकीत जनता आडवे केल्याशिवाय राहणार नाही, अशी जळजळीत टीका येथील प्रचार सभेत बोलताना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारवर केली.येथे गुरुवारी दुपारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात एरंडोल विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ.सतीष पाटील यांच्या प्रचारासाठी खासदार अमोल कोल्हे यांची जाहीर सभा झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ.कोल्हे यांनी आपल्या २० मिनिटांच्या भाषणात युती सरकारचा खरपूस समाचार घेतला.महाराष्ट्रातील गडकिल्ले भाड्याने देण्याचा निर्णय ३ सप्टेंबरच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यासंदर्भात चर्चा होत असताना सत्तेत असलेला शिवसेनेचा ढाण्या वाघ नंदीबैलासारखा मान डोलवत होता. तसेच इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हद्दपार करण्यात आला. त्याला जबाबदार असलेल्या शिवसेना व भाजपला महाराष्ट्र हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असे डॉ. कोल्हे म्हणाले.पाच वर्षात महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने भुकेला राहिला. १ लाख ४२ हजार उद्योग बंद पडले. १६ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या असून त्या वाढत आहेत. बेरोजगारी सुद्धा आ वासून उभी राहिली आहे. महाराष्ट्र ही संतांची व थोर पुरुषांची भूमी आहे. संतांनी हात पसरायला सांगितलेले नाही तर हातांना रोजगार दिला पाहिजे. पाच वर्षात सत्तेवर असतांना १० रुपयांची थाळी आली नाही आणि आता मतांचा जोगवा मागण्यासाठी १० रुपये थाळीचे प्रलोभन दाखविले जात असल्याचे डॉ.कोल्हे म्हणाले.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सेल्फीबद्दलही त्यांनी टीकास्त्र सोडले. आपल्या दिमाखदार शैलीत डॉ.कोल्हे यांनी ई.डी. व सी.बी.आय.चौकशीसंदर्भात हल्लाबोल करून ते पुढे म्हणाले की, अजगररुपी युती सरकारने आपल्या धाकात शिवसेनेच्या ढाण्या वाघाला गिळले व शेवटी ई.डी.च्या चौकशीत शरद पवार साहेबांना अडकविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी ई.डी.लाच वेडे केले.व्यासपीठावर राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ.सतीष पाटील, रविंद्र पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख पराग पवार, अमित पाटील, तालुकाध्यक्ष प्रा.मनोज पाटील, डॉ.राजेंद्र देसले, विकास पवार, राजेंद्र शिंदे, आकाश पाटील, विश्वासराव भोसले, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन, सुकलाल महाजन, डॉ.के.ए.बोहरी, बाळासाहेब पाटील, डॉ.फरहाज बोहरी, संजय भदाणे, इमरान सैयद आदी उपस्थित होते.
ज्यांनी शिवाजी महाराजांचे स्मारक उभे केले नाही ते महाराष्ट्र काय उभा करणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 5:51 PM