आनंद सुरवाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनानंतर म्युकरमायकोसिस या अपिरिचित अशा आजाराने डोके वर काढले होते. यातून परिस्थिती सावरत असतानाच आता म्युकरमायकोसिसच्या शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना पुन्हा या बुरशीचा त्रास होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शस्त्रक्रिया झालेले चार रुग्ण पुन्हा हा त्रास घेऊन खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. लपलेल्या बुरशीमुळे हा त्रास पुन्हा उद्भवत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात मे महिन्यापासून म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण समोर येऊ लागले होते. त्यावेळी शासकीय यंत्रणेत यावरील उपचार पद्धती नव्हती, काही मोजक्या खासगी दवाखान्यात उपचार केले जात होते. मात्र, हळूहळू रुग्ण वाढू लागल्याने अखेर शासनाने या आजाराचा महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत समावेश केला आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात या आजारावर उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान, शस्त्रक्रिया केलेल्या काही रुग्णांना पुन्हा म्युकरचा त्रास होत असल्याचे समोर आले आहे. या रुग्णांनी सीटीस्कॅन, एमआरआय केल्यानंतर त्यांना पुन्हा म्युकरचे निदान झाले आहे. याला वैद्यकीय भाषेत रिकरन्स असे संबोधले जाते, म्युकरमध्ये असे होऊ शकते, असे जीएमसीचे उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांनी सांगितले.
का होतोय पुन्हा म्युकरचा त्रास?
म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार आहे. यात नाका, तोंडातून बुरशी वाढत जाऊन ती थेट डोळे व मेंदूपर्यंत जाऊ शकते. यात लवकरात
लवकर निदान करून त्यावर उपचार घ्यावे लागतात. बुरशीची वाढ अधिक होत असल्याने पुढील धोके टाळण्यासाठी शस्त्रक्रियेद्वारे या
संसर्गाचा काही भाग काढलो जातो. मात्र, अगदी सूक्ष्म भाग जो डॉक्टरांच्याही निदर्शनास येऊ शकत नाही, अशा ठिकाणची ही बुरशी
शस्त्रक्रियेनंतर डोके वर काढू शकते, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशी बुरशी वाढू नये यासाठी ऐम्फोटेरिसीन बी हे इंजेक्शन दिले जाते.
ही घ्या काळजी
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांनी डॉक्टरांनी सांगितलेले संपूर्ण उपचार, इंजेक्शनचे सांगितलेले पूर्ण डोस घ्या.
शस्त्रक्रिया झाल्यानंतर किंवा औषधोपचाराचा कालावधी संपल्यानंतर दुर्लक्ष करू नका, लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांशी संपर्क करा.
नाक, कान, डोळे स्वच्छ ठेवा, बांधकाम सुरू असलेल्या भागात जाऊ नका, अशा ठिकाणी मास्कचा वापर करा, पावसाळ्यात हात, पाय स्वच्छ ठेवा.
सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण
डॉ. उल्हास पाटील रुग्णालय : २०
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय : ११
कोट
म्युकरच्या रुग्णांनी अधिक दक्ष राहणे गरजेचे आहे. डॉक्टरांकडे फॉलोअपसाठी नियमित जावे, स्वच्छतेची काळजी घ्यावी, लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, शिवाय इंजेक्शनचे डोस व औषधोपचार पूर्ण करावा. - डॉ. धमेंद्र पाटील, नेत्ररोगतज्ज्ञ