नशिराबाद : कोरोना महामारीतून देश मुक्त व्हावा यासह सर्वांना सुख व चांगले आरोग्यप्राप्तीसाठी येथील ग्रामदैवत प. पू. संत झिपरू अण्णा महाराज मंदिरात श्रींच्या मूर्ती व समाधीवर महाअभिषेक पूजन करण्यात आले. चाळणी धरत सहस्र जलधारा अभिषेक झाला. लाॅकडाऊनमुळे व शासनाच्या आदेशानुसार मंदिराचे महाद्वार बंद असून, आत गाभाऱ्यात श्रींचे केवळ अभिषेक पूजन व सुक्त पठण, पारायण वाचन करण्यात येत आहे. पुण्यतिथी उत्सवानिमित्त सर्व कथा प्रवचने, कीर्तने, आदी कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहे.
वाकी नदीकाठावरती श्रींचे नयनरम्य समाधी मंदिर आहे. पुण्यतिथी उत्सवानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रम घेण्यात येत असतात. मात्र, यंदा कोरोना महामारी व लाॅकडाऊनमुळे सर्व कार्यक्रम झिपरू अण्णा महाराज स्मारक समितीने रद्द केलेले आहे.
यंदा साधेपणाने पुण्यतिथी साजरी होत आहे. कोरोना संसर्ग महामारीतून देशाला मुक्ती मिळावी, अशी प्रार्थना श्रींना करण्यात येत आहे.
उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी श्रींना सहस्त्र जलधारा अभिषेक करण्यात आला. याप्रसंगी स्मारक समितीचे संचालक ॲड. शशिकांत डहाके, गौरव कुळकर्णी, पुजारी जयंत गुरव यांच्या हस्ते जलधारा महाभिषेक केला. याप्रसंगी पुरोहित प्रसाद महाराज धर्माधिकारी यांनी वेदमंत्रोचार केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झिपरू अण्णा महाराज स्मारक समितीचे पदाधिकारी परिश्रम घेत आहे.
दिव्यांच्या रोषणाईने उजळला श्रींचा गाभारा
नशिराबाद संत झिपरू अण्णा महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त यंदाही उत्सवाच्या प्रारंभदिनीच सायंकाळी शेकडो पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. दीपोत्सवाने मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. याप्रसंगी दीपोत्सवाने स्वस्तिक ओम आधी आकार काढून दीपोत्सव करण्यात आला. मंदिराच्या गाभाऱ्यात समाधी मंदिराजवळ पणत्या लावून दीपोत्सव केला होता. त्यामुळे मंदिराचा गाभारा दिव्यांच्या रोषणाईने लखलखून निघाला. दरम्यान, उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पराग कुलकर्णी व पुजारी जयंत गुरव यांच्या हस्ते श्रींना महाअभिषेक पूजन करण्यात आले.