लोकमत न्यूज नेटवर्क
पाचोरा : देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी... गदिमांच्या या काव्यपंक्तीसारखीच काहीशी अवस्था राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेता करण आणि त्याच्या कुटुंबाची झाली असून त्याच्या आई-वडिलांच्या थकलेल्या डोळ्यांमध्ये आनंदाचे अश्रू आले आहेत.
लोकमत’मध्ये बाल शौर्य पुरस्कार विजेत्या करणच्या कौटुंबिक आर्थिक स्थितीबद्दल ‘शौर्याच्या माथी अभिशाप दारिद्र्याचा...’ या शीर्षकाखाली वृत्त धडकताच आणि या कुटुंबाची आर्थिक विवंचना लक्षात येताच समाजातून माणुसकी हरवली आहे, अशी टीका करणाऱ्यांना जोरदार चपराक देत संवेदनशील समाजाचे आणि माणुसकीचे दर्शन घडवत अनेकांनी मदतीचा हात देऊ केला आहे. आमदार किशोर पाटील यांनी ‘लोकमत’शी प्रत्यक्ष संवाद साधत करण आणि त्याच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले.
दरम्यान पाचोरा विभागाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनीदेखील ‘लोकमत’शी स्वतः संपर्क साधून या कुटुंबाची माहिती जाणून घेतली आणि शासकीय पातळीवर शक्य असल्यास सर्वतोपरी मदत करणार असल्याचे बोलून दाखवले.
जळगाव येथील ॲड. याकूब तडवी यांनी तात्काळ करणच्या बँक खात्यावर मोठी रक्कम पाठविली असून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय ओंकार वाघ यांनी या संपूर्ण परिवाराला दिल्ली येथे जाण्यासाठी येणारा संपूर्ण खर्च देण्याचे जाहीर केले आहे. पाचोरा येथील प्रदीप शांताराम पाटील यांच्यासह हायटेक कंप्युटर्सचे संचालक नितीन पाटील यांनी स्वतः या परिवाराला आर्थिक मदत करावयाचे ठरविले आहे.
गो. से. हायस्कूलच्या १९९२मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांच्या ९२डायमंडस या ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने वैशाली चौधरी, योगेश संघवी, राजेंद्र महाजन, नितीन पाटील, मनीष भोसले, ताहेर बोहरी, किरण सोनार, शिल्पा भालेराव, संगीता संजय पाटील, सविता पाटील, रश्मी शिरसाठे, दीपाली वाणी/कासोदेकर, सोनाली पाटील, कामिनी तांबोळी यांनी मदत जाहीर केली आहे. काही दातृत्ववान नागरिकांनी नाव न जाहीर करतादेखील मदत केलेली आहे. जालना येथील उपप्राचार्य डॉ. संजय आत्माराम पाटील यांनी या विद्यार्थ्याच्या पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्चाचा भार घेण्याचे जाहीर केले आहे तर त्याच्या नोकरीसाठी आणि शिक्षणासाठीदेखील येणारा खर्च माजी सैनिक समाधान पाटील हे घेणार आहेत.
गावातील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुभाष देसले यांनी सुरुवातीपासूनच करणच्या प्रस्तावासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी आणि ते पाठवण्यापर्यंतचा पर्यंतचा सगळा खर्च उचललेला आहे.