वासेफ पटेल ।भुसावळ : जगासह संपूर्ण देशांमध्ये कोरोनामुळे महामारीचे संकट ओढवले आहे. अशा या कोरोनाला लगाम बसावा याकरिता शासनाने लॉकडाऊन केले आहे. मात्र हातावरच्या मजुरांना लॉकडाऊन काय आहे, कोरोनाचा संसर्ग काय आहे याची जणू काहीच माहिती नाही. अचानक घ्याव्या लागलेल्या निर्णयामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी राज्यात आलेल्या परप्रांतीय मजुरांची स्थिती काही औरच आहे. रोजगार बंद पडल्याने हजारो लोक पायीच गावाकडे निघावे लागले आहे.यासंदर्भात साकेगाव जवळील महामार्गावर सकाळी ९ ते दुपारी १ यादरम्यान सर्वेक्षण केले असता चार तासांच्या कालावधीत सुमारे दोन हजार लोक आपल्या गावाकडे मार्गक्रमण करताना दिसून आले. अनेकांच्या डोक्यावर सामानही होते. कोरोनामुळे काय होईल हे माहीत नाही मात्र अशा भटकंती उन आणि भूक यामुळे आम्ही जीवंत घरी पोहचू की नाही? अशी शंकाही काहींनी व्यक्त केली.लहान मुलांसह वयोवृद्धांचे जथ्थेच्या जथे आपल्या गावी परतण्यासाठी रस्त्यावर दिसत होते. चार तासाच्या सर्वेक्षणात जवळपास पंचवीस ते तीस जथ्थ्यांच्या माध्यमातून दोन हजार लोकांनी पायपीट सुरु असल्याचे दिसले.कधी बसतात दंडे तर कधी मिळते जेवण ...कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी हजारो किलोमीटर लांब जळगावसह ठिठिकाणी परप्रांतीय मजूर आले आहेत. संसर्गजन्य कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता यावा याकरिता शासनाने २३ मार्च पासून अचानक लॉकडाऊन ची घोषणा केली. यानंतर स्थानिक लोकांनी घरातच राहून स्वत:ला लॉकडाउन करून घेतले व स्वत:ची काळजी घेतली मात्र राज्यभरात परप्रांतातून कामानिमित्त आलेले लाखो मजूर बेरोजगार झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. गावाकडे जाण्यासाठी कोणत्याही वाहनाची उपलब्धता नाही. कसेतरी दररोज पायपीट करून गावाकडे ते मोठ्या संख्येने निघाले आहेत. मात्र रस्त्यात पोलिसाकाडून काही वेळा दंडे खावे लागेल तर काही वेळी खाकीतल्या माणुसकीने दोन घास जेवणही दिले.
गावी जाण्यास हजारो लोकांची पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 4:41 PM