जळगाव : पतीला कॅनडा येथे नोकरी लावून देण्याचे आमिष देत मुंबईच्या एका ठगाने किर्ती प्रवीण पगारीया (रा.वर्धमान नगर) यांना ६० हजार रुपयांत गंडा घातल्याची घटना समोर आली. ३० एप्रिल ते ३१ मे २०१९ या कालावधीत ही फसवणूक झाली असून याप्रकरणी गुरुवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात शैलेश छेडा (रा.अंधेरी, मुंबई)याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.सागरपार्क परिसरात वर्धमाननगरात किर्ती या पती प्रवीण पगारीया तसेच आई वडीलांसह राहतात. त्या जळगाव येथे खाजगी नोकरी करतात.शैलेश छेडा हा परदेशात नोकरी लावून देता असे किर्ती यांना अहमदनगर येथील परिचित स्वप्निल मुथा यांनी एप्रिल महिन्यात सांगितले होते. त्यानुसार त्याच्याशी संपर्क झाल्यावर छेडा याने किर्ती यांना मुंबई येथील ट्रायबल इंटरनॅशनल कंपनीत पैसे भरुन नोकरी मिळवून देण्याबाबत संदेश तसेच जाहीराती पाठविण्यास सुरुवात केली. यानंतर कॅनडात नोकरी मिळवून देण्यात आश्वासन देत मुंबई येथे भेटायला बोलाविले.पगारिया यांनी छेडा याची मुंबईत भेट घेतली असता त्याने कागदपत्रांची मागणी केली. यानुसार प्रवीण पगारीया यांनी कागदपत्रे पुरविले, नंतर या कामासाठी ६० हजार रुपये कंपनीत भरण्याचे सांगितले. त्यानुसार ३१ मे रोजी पगारीया यांनी छेडा याने दिलेल्या कंपनीच्या स्टेट बँकेच्या खात्यात ६० हजार रुपये एनईएफटीव्दारे भरले. मात्र नोकरीबाबत काहीच हालचाल झाली नाही. १५ दिवसांनी छेडा याला नोकरीबाबत विचारले असता, त्याने उडवाउडवीचे उत्तरे देण्यात सुरुवात केली.अनेकदा याचप्रकारे उत्तरे मिळाल्यावर फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर किर्ती पगारीया यांनी गुरुवारी शैलेश छेडा विरोधात फसवणूक केल्याची तक्रार दिली.