जळगाव : मागील भांडणाच्या कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद होऊन शशिकला पुंजू बाविस्कर (३५) या महिलेला तसेच भाऊ व इतरांना काठीने मारहाण करण्यात आली. त्यानंतर अश्लील शिवीगाळ करून घरात एकटी असली की तलवारीने कापून टाकण्याची धमकी दिल्याची घटना रविवारी दुपारी जिजाऊ नगरात घडली. याप्रकरणी राजू किसन बाविस्कर, संगीता राजू बाविस्कर, आशिष राजू बाविस्कर व लक्ष्मी राजू बाविस्कर यांच्याविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार अनिल मोरे करीत आहेत.
जिल्ह्यात १० एप्रिल रोजी लोकअदालत
जळगाव : तडजोडपात्र खटले मिटविण्यासाठी १० एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात मोटार वाहन, वाहतुकीचे चलन, भूसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक खटले, मोटार अपघात, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित असलेले खटले लोकअदालतीत ठेवले जाणार आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी. जगमलानी व विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.एच. ठोंबरे यांनी केले आहे.
कॅडबरी घ्यायला आलेल्याने बॅग लांबविली
जळगाव : दुकानात कॅडबरी घ्यायला आलेल्या ग्राहकाने दुकान मालकाचीच बॅग लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ११ मार्च रोजी कोर्ट चौकासमोर हा प्रकार घडला. याप्रकरणी सोमवारी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेशकुमार अर्जुनकुमार ललवाणी (३२, रा. दौलतनगर) यांची ही बॅग होती. त्यात १५ हजार रुपये, मोबाइल व काही कागदपत्रे होती.
अल्पवयीन मुलीस पळविणाऱ्यास अटक
फोटो- १५ सीटीआर ३३
जळगाव : अहमदाबाद येथून अल्पवयीन मुलीला पळवून आणणाऱ्या मयूर अशोक पाटील (रा. जळगाव) याला गुजरात पोलिसांनी रविवारी पहाटे तीन वाजता एमआयडीसीतून अटक केली. यावेळी पळवून आणलेली मुलगीही मिळून आली. उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, गोविंदा पाटील यांच्या पथकाने गुजरातच्या पोलिसांना मदत करून आरोपी मिळवून दिला. पथक अहमदाबादला रवाना झाले.