जळगाव : नोकरीचे आमीष दाखवून फसवणूक झालेल्या आदीनाथ दत्तू भिंगारे (२०, रा.देवळाली प्रवरा, ता.राहुरी, जि.अहमदनगर)या तरुणाने शुक्रवारी सकाळी पाचोरा येथे रेल्वेखाली आत्महत्या केली. पोलिसात दिलेली तक्रार मागे घ्यावी, अन्यथा तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी कंपनीच्या लोकांनी दिली होती, त्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याची चर्चा असून तशी माहिती व कंपनी कशी फसवणूक करते याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.काय आहे नेमका प्रकारखेडी पेट्रोल पंपाच्या मागे ओम साई नगरात एका अलिशान इमारतीत नारायणी असोसिएटस् फ्रॅँचाइजी, ग्लेझ ट्रेडींग कंपनीचे(दिल्ली) कार्यालय उघडण्यात आले आहे. ओमप्रकाश कुमार याने जिल्ह्याची फ्रँचाइजी घेतलेली आहे. आदीनाथ दत्तू भिंगारे या तरुणाला अविनाश विक्रम काळे याने डाटा एन्ट्रीची नोकरी मिळेल असे सांगून जळगावात बोलावून घेतले. जेवणाचा खर्च सांगून त्याच्याकडून १८ हजार रुपये घेण्यात आले.डाटा एन्ट्रीचे काम न देता त्याच्या हातात सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू विक्रीसाठी देण्यात आल्या. या वस्तू विक्री होत नसल्याने त्याने या वस्तू परत केल्या, मात्र त्यांनी वस्तू परत घेतल्या जात नाहीत, तुला त्या विक्री कराव्याच लागतील असे सांगून हाकलून लावले. त्याने भरलेले पैसे परत मागितले असता ते देखील दिले नाहीत. गावाला परत जाण्यासाठी भाड्यालाही पैसे नसल्याने भिंगारे याने एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून फसवणूक झाल्याची तक्रार केली होती.आदीनाथ गरीब कुटुंबातील मुलगाआदीनाथ भिंगारे हा अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगा होता. जळगावला तो २८ जून रोजी आलेला होता. येथे येण्यापूर्वी तो राहुरी फॅक्टरी येथे धनलक्ष्मी या लॉजमध्ये कामाला होता.कागदावर घेतल्या जबरदस्तीने सह्याअहमदनगरच्या एका तरुणाने आदीनाथच्या बाबतीतची फसवणुकीच माहिती व बिहारमधील एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल केलेला आहे. त्यात पोलिसात दिलेली केस मागे घे, नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही असे धमकावत आहेत. तुझे पैसे परत करतो असेही त्यांच्याकडून सांगितले जात आहे. दरम्यान, कंपनीच्या लोकांनी काही कागदावर आदीनाथच्या जबरदस्तीने सह्या घेतल्या. याबाबत मी काय करु काहीच सूचत नाही असे आदीनाथने आपल्याला सांगितल्याचा दावा नगरच्या मित्राने केला आहे. भाड्याला पैसे नसतील किंवा कंपनीवाले पैसे देत नसतील तरीही आहे त्या परिस्थितीत निघून ये असे आपण आदीनाथला समजावले असेही या तरुणाच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या स्वीय सहाय्यकामार्फत एमआयडीसी पोलिसांशी संपर्क करुन त्याला मदत करण्याचे सांगितले होते. त्यानंतर दोन दिवस आदीनाथशी संपर्कच झाला नाही.तरुणाने आत्महत्या केल्याचे समजले. तक्रार मागे घेण्याबाबत त्याला धमकावले जात असल्याचे ऐकले आहे, मात्र अजून तशी तक्रार कोणी केलेली नाही. आतापर्यंत कंपनीच्या केलेल्या चौकशीत भाडे करारनामा, शॉप अॅक्ट, अन्न सुरक्षा व फ्रॅँचाईजीबाबतचे सर्व कागदपत्रे नियमात असल्याचे आढळून आले आहे. आणखी चौकशी सुरु आहे.-अतुल वंजारी, तपासाधिकारी
फसवणूक झालेल्या तरुणाची आत्महत्या, पोलिसात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी धमकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:27 PM