लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : माझ्याशी प्रेमसंबंध ठेवले नाही तर मी आत्महत्या करून घेईल आणि तुमच्या कुटूंबाला अडकवून टाकेल, अशा वारंवार धमक्या देणा-या अक्षय रामचंद्र सुरवाडे (रा. पिंप्राळा) या तरूणाच्या त्रासाला कंटाळून १९ वर्षीय युवतीने राहत्या घरामध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली.
ही घटना शनिवार, दि. १२ मार्च रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून याबाबत युवतीच्या आईने उशिराने तक्रार दिल्यानंतर तरूणाविरूध्द रविवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१९ वर्षीय युवती ही रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुटूंबासह वास्तव्यास होती. तिचे अक्षय सुरवाडे या तरूणाशी प्रेमसंबंध होते. याची माहिती युवतीची आईला माहिती पडल्यानंतर त्यांनी तिची समजूत घालून मुलापासून दूर राहण्यास सांगितले होते. मुलालाही यापूढे तिला संपर्क साधू नको, असे सांगितले होते. मात्र, तरीही तो युवतीला माझ्याशी प्रेमसंबंध ठेव नाही तर मी आत्महत्या करून घेईल आणि तुझ्या घरच्यांना सुध्दा मारून टाकेल, अशा धमक्या मोबाईलवर व प्रत्यक्ष भेटून देत होता. तर तिच्या मोठ्या बहिणीला सुध्दा व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून तुझ्या बहिणीला माझ्याशी बोलायला सांग, नाही तर तुम्हाला सर्वांना मी पाहून घेईल, अशी धमकी देत होता. युवतीने त्यास प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्यावरही तो त्रास देत होता. अखेर या त्रासाला कंटाळून युवतीच्या आईने ६ मार्च रोजी पोलिसात तक्रार दिली होती. तरीही सुरवाडे हा तिला धमक्या देत असल्यामुळे युवती मानसिक त्रासात होती.
अखेर शनिवारी सकाळी ११ वाजता तिने घरात कुणीही नसताना सुरवाडे याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर युवतीच्या आईने संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली. त्यानंतर रविवार, दि. १९ रोजी दुपारी तक्रार दिल्यानंतर तरूणाविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"