लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा रुग्णालयाकडून मोहाडी रुग्णालयात खरेदी झालेल्या ३० व्हेंटिलेटरपैकी दोन व्हेंटिलेटर सुरू करून पुण्याच्या कंपनीचे इंजिनिअर्स अशोक ओढ यांच्या उपस्थितीत तपासणी करण्यात आली. नियुक्त समितीने साडेतीन तास सर्व तांत्रिक बाबी समजून घेतल्या. दरम्यान, कंपनीच्या प्रतिनिधींनी चेकलिस्ट न दिल्याने आता त्यानुसार बुधवारी पुन्हा तपासणी होणार आहे.
मोहाडी रुग्णालयात १५ न्यूओनॅटल व १५ ॲडल्ट असे व्हेंटिलेटर आणण्यात आले आहेत. या व्हेंटिलेटरच्या खरेदीप्रक्रियेत घोळ झाल्याचा, नोंदविलेल्या मॉडेलपेक्षा वेगळेच व्हेंटिलेअर आणल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी केला आहे. या व्हेंटिलेटरमधील तफावतीबाबत अधिकाऱ्यांनी त्यांना लिहून दिले होते. दरम्यान, या सर्व प्रकाराची समितीमार्फत चौकशी करण्यात येत आहे. प्रशासन अधिकारी डॉ. यू. बी. तासखेडकर यांच्यासह समितीने दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता तपासणीला सुरुवात केली. यात एक न्यूओनॅटल व एक ॲडल्ट असे दोन व्हेंटिलेटर इंजिनिअर ओढ यांनी सुरू करून दिले. त्यानंतर त्यात पाहणी करून माहिती घेण्यात आली.
गुरुवारी अहवाल
चेकलिस्ट नसल्याने स्पेसिफिकेशन तपासणी करणे शक्य नव्हते, ही चेकलिस्ट कंपनीचे प्रतिनिधी तसेच इंजिनिअर यांच्याकडे नव्हती, त्यामुळे ही चेकलिस्ट बुधवारी प्राप्त झाल्यानंतर सकाळी ११ वाजेपासून तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर गुरुवारी यासंदर्भातील एकत्रित अहवाल सादर केला जाईल, असे डॉ. यू. बी. तासखेडकर यांनी सांगितले.
उपोषणाबाबत नाशिकवरून विचारणा
व्हेंटिलेटर घोटाळ्यात कारवाई न झाल्यास १५ ऑगस्टपासून आपण उपोषणास बसणार असल्याचा इशारा या प्रकरणातील तक्रारदार दिनेश भोळे यांनी दिला आहे. त्यांनी याबाबत पोलीस प्रशासनासही मंगळवारी पत्र दिले आहे. दरम्यान, नेमके कोण उपोषण करणार आहे, अशी नाशिक आयुक्तस्तरावरून जिल्हा रुग्णालयात विचारणा करण्यात आल्याची माहिती आहे.