संजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : पशुवैद्यकीय पर्यवेक्षकांचे बेमुदत आंदोलनाचा फटका शेतकरी आणि पर्यायाने पशुधनाला बसत आहे. तालुक्यात लाळ खुरगट रोगाची लागण होत आहे. दोन दिवसात तीन जनावरे मृत झाली आहेत. दुसरीकडे अनेक जनावरांना खुरदुखी आजाराची लागण झाली आहे.
पशुवैद्यकीय पर्यवेक्षकांचे बेमुदत आंदोलन त्वरित थांबवा, अशी मागणी हतबल शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. तालुक्यातील मांडळ येथे दोन जनावरे, तरवाडे येथे गाय मेली आहे तर एक म्हैस आजारी आहे. नालखेडा येथे जनावरांना खुरदुखीच्या आजाराची लागण झाली आहे.
जास्त दूध देणारी जनावरे मिळावीत म्हणून कृत्रिम गर्भधारणा करून संकरित कालवड जन्माला घालण्याचे कामदेखील खासगी पशुवैद्यकीय पर्यवेक्षक करीत असतात; मात्र काम बंद आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या जोडधंद्यावरही संकट आले आहे.
जुलै, ऑगस्ट महिना हा जनावरांच्या दूधवाढीचा कालावधी असतो; मात्र त्यांना वैद्यकीय सेवा मिळत नाही. पावसाळ्यात लाळ खुरगट, फऱ्या, घटसर्प या आजारांचा संसर्ग वाढण्याची भीती असते तर शेळ्या-मेंढ्यांना लसीकरण केले जाते. ही सर्व सेवा थांबली आहे. आधीच पावसाने दांडी मारली आहे, त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला दुभत्या जनावरांकडून मिळणाऱ्या जोड उत्पन्नाचा आधार होता; पण त्यावरही विरजण पडले आहे. त्यामुळे आंदोलन मिटवण्याची मागणी केली जात आहे.
अमळनेर तालुक्यातील सुनील वीरचंद पाटील, गुलाब दौलत वारुळे, विजयकुमार पाटील, दीपक पंढरीनाथ पाटील, अजय साळुंखे , संजय पाटील, चंद्रकांत लोहरे, संजय रामकृष्ण पाटील, गजानन चौधरी, भूषण जोशी, उमेश पाटील, शिवरत्न पाटील, विजयकुमार पाटील , विक्रांत पाटील , प्रमोद पाटील,सुमित पाटील, सचिन पाटील, ऋषिकेश पाटील, स्वप्नील पाटील, दिगंबर माळी, भटू संदानशीव, राजेंद्र बाविस्कर , प्रभुसिंग परदेशी , नीलेश मोरे, गुलाब मोरे, सोपान पाटील हे पर्यवेक्षक संपावर आहेत. या आहेत मागण्या
पदविका प्रमाणपत्रधारकांची
शैक्षणिक अहर्ता भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ च्या अनुसूचित समाविष्ट कराव्यात, पशुधन पर्यवेक्षकांची पदे तत्काळ व सरळ सेवेने भरावीत. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
शासनाच्या टँगिंग , पशुगणना, लसीकरण कामात पदविकाधारक पर्यवेक्षकांची मदत घेतात मग नोकरीत शैक्षणिक पात्रता का चालत नाही. १८
वर्षांपासून पदे रिक्त आहेत. - दीपक पाटील, पशू पर्यवेक्षक, मांडळ ता. अमळनेर.
खासगी पशू पर्यवेक्षक संपावर आहेत. वैद्यकीय सेवा मिळाली नाही म्हणून गाय मेली, म्हैस आजारी आहे. शासकीय सेवा मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. -रामकृष्ण पाटील, सरपंच, तरवाडे, ता. अमळनेर.