जळगाव : दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून त्यातील तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून जळगाव, पुणे व नाशिक जिल्ह्यातून चोरी झालेल्या १७ दुचाकी हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. अतुल नाना पाटील (पथराड, ता. भडगाव), भीमराव रामअवतार प्रसाद व अमजद आरिफ मन्सुरी (दोन्ही रा. देवळा, जि. नाशिक) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. या चोरट्यांकडून चोरी झालेल्या रामानंद नगर हद्दीतील १, चाळीसगाव शहर ५, चाळीसगाव ग्रामीण १, पाचोरा २, पारोळा २, मालेगाव छावणी ३, भोसरी (पुणे) १ व उर्वरित २ अशा १७ दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. अतुल नाना पाटील याच्याकडे चोरीच्या दोन दुचाकी असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पथक रवाना केले होते. अतुल याच्याकडे चोरीच्या दुचाकी मिळाल्यानंतर पोलीस खाक्या दाखविताच त्याने त्याचे साथीदार योगेश शिवाजी दाभाडे, जगदीश बाळू शेळके, नीलेश ऊर्फ विक्की पुंडलिक पाटील (सर्व रा. पथराड, ता. भडगाव), भीमराव रामअवतार प्रसाद व अमजद आरिफ मन्सुरी यांची नावे सांगितली. यातील चौघांनी चोरलेल्या दुचाकी भीमराव प्रसाद व अमजद मन्सुरी यांच्याकडे विक्रीसाठी दिल्याचे निष्पन्न झाले. या दोघांसह अतुलकडे या सर्व दुचाकी मिळून आल्या. त्याची किंमत ५ लाख ७ हजार रुपये इतकी आहे. नंदलाल पाटील व भगवान पाटील यांनी ही कामगिरी केली असून त्यांना सहायक फौजदार विजय देवराम पाटील, नरेंद्र वारुळे व संदीप साळवे यांनी आरोपींची तांत्रिक माहिती पुरविली आहे.
फोटो..१४ सीटीआर ४७