रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव- कामाला असतानाचे पैसे बाकी असल्याच्या कारणावरून तिघांनी एका तरुणासह त्याच्या कुटुंबीयास बेदम मारहाण करीत जखमी केल्याची घटना गुरुवार रात्री ८ वाजेच्या सुमारास पिंप्राळा हुडको परिसरात घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील मरिमाता मंदिराजवळ संजय गयबू पाटील (३३) हे कुटुंबीयांसह वास्तव्यास असून मजुरी करून कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. दरम्यान त्यांच्या घरासमोरील योगेश किशोर मोरे, गणेश किशोर मोरे व उमेश किशोर मोरे हे त्यांच्या घरी आले व तू आमच्याकडे कामाला होता त्यावेळेसचे पैसे तुझ्याकडे बाकी असून ते पैसे मला परत दे. यावर संजय यांनी तुमचे पैसे सकाळी देतो असे सांगितले. मात्र किशोर मोरे याने शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावर योगेश व गणेश मोरे यांनी देखील पैसे घेतल्याशिवाय तुला सोडणार नाही असे म्हणत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान योगेशने त्याच्या हातातील लाकडी काठीने हाता-पायासह डोक्यावर मारून संजय यांना जखमी करीत तुला पाहून घेतो, अशी धमकी दिली. याप्रकरणी शुक्रवारी तिघांविरुद्ध रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.