सायगाव, ता, चाळीसगाव : येथे एकाच रात्री तीन धाडसी चोऱ्या झाल्या. यात दागिने व मोटरसायकल असा एकूण दोन लाखांचा ऐवज लंपास झाला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भिती निर्माण झाली आहे.याबाबत वृत्त असे की, सायगांव नवेगावांत सोमवारी रात्री कपिल धर्मा काळे यांच्या घरासमोरून मोटार सायकल चोरीला गेली. तेथुन पुढे चोरटे ग्रामपंचायतीच्या मागे राहत असलेले सुकदेव बापु पवार यांच्या घरी पोहोचले सुकदेव पवार हे आपल्या कुटुंबासह अवधान ता. धुळे येथे गेले असल्याने चोरट्यांनी संधीचा फायदा उचलत घराच्या दोन्ही दरवाजाचे कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला व दागिन्यांसह सव्वा लाखांचा ऐवज चोरून नेला. हे चोरटे ३ ते ४ जण असल्याचा अंदाज असुन त्यांच्या पायाचे ठसे देखील कपाशी मध्ये आढळून आले. चोरटे एवढयावरच न थांबता त्यांनी धनगर गल्लीत प्रवेश केला. तेथे युवराज बच्छे व त्यांचे कुंटुबीय झोपेत असतांना युवराज बच्छे यांच्या पत्नीच्या अंगावरून ५ ग्रॅमची पांचाली, २ ग्रॅम मनी व २५० रुपये चोरून नेल. घाईगडबडीत शेजारील रहिवासी जागी झाल्याने त्यांनी गिरणा नदीकडे पोबारा केला. चोरटे पळ काढतांना बºयाच ग्रामस्थांनी पाहिले . दरम्यान पंधरा दिवसापुर्वी साहेबराव आनंदा पाटील यांच्या घरी देखील दुपारी दरवाजाचा कडीकोंडा तोडून चोरी झाली होती तसेच मागे शुक्रवारच्या बाजारात आमोदे येथील दोन नागरीकाच्या सुमारे २५ हजार रुपये किमतीच्या दोन मोबाईलची देखील चोरी झाली होती.सीसीटीव्ही कॅमेरे ठरताहेत शोपीससायगांव हे नवेगांव व जुनेगांव मिळुन बाजारपेठेचे मोठे गावं असल्याने मेहुणबारे पोलिसांनी लोकवर्गणी करून चौकाचौकांत कॅमेरे बसविले आहे, पण बरेच सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहे. यामुळे चोरटे चोरी करुन निघुन जातात पण सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता चोरट्यांचा काहीही मागमुस सापडत नसल्याने एवढा मोठा गाजावाजा करून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे आज शोपीस ठरत आहेत असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दुसरीकडे आजपर्यंत जेवढ्याही मोठया चोºया झाल्या तपास लागला नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
सायगाव येथे एकाच रात्री तीन चोऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 7:36 PM