जळगाव,दि.26- जळगाव जिल्हा परिषदेचे सीईओ आस्तिककुमार पांडेय यांची अकोला जिल्हाधिकारीपदी बदली झाल्यानंतर अवघा सहा दिवसात तीन जणांच्या नियुक्तीचे आदेश शासनाने काढले आहेत. अखेर बुधवारी गडचिरोली येथील साहाय्यक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या नियुक्तीचे आदेश शासनाने काढले आहेत.
जळगाव जिल्हा राजकीयदृष्टय़ा संवेदनशील आहे. त्यामुळे या ठिकाणी नियुक्त अधिका:यांची काम करीत असताना तारेवरची कसरत होत असते. जि.प.चे सीईओ आस्तिककुमार पांडेय यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या जागी अकोला जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या आशयाचे आदेश देखील निघाले होते. मात्र काही क्षणात जी.श्रीकांत यांच्या ऐवजी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील साहाय्यक आयुक्त एस.जी.कोलते यांची नियुक्ती झाली. त्यांच्या नियुक्तीच्या आदेशांना पाच दिवस होत नाही, तोच बुधवार 26 रोजी जळगाव जि.प.च्या सीईओपदी गडचिरोली येथील साहाय्यक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची नियुक्ती झाल्याचे आदेश शासनाने काढले आहे. एस.जी.कोलते यांची आता नागपूर येथे आयुक्त (मनरेगा) या पदावर नियुक्ती झाली आहे.
दिवेगावकर हे गडचिरोली येथे साहाय्यक जिल्हाधिकारी असतांनाच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा त्यांच्याकडे अतिरिक्त पदभार होता. ते डिसेंबर 2015 मध्ये गडचिरोली येथे रुजू झाले होते. 7 डिसेंबर 2015 रोजी त्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात प्रकल्प अधिकारी म्हणून पदभार स्विकारला होता. 1 वर्ष 4 महिने असा गडचिरोली येथील त्यांचा कार्यकाळ होता.