जळगाव : भाजप उमेदवार उन्मेष पाटील यांच्याविरूद्ध सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट टाकल्याबद्दल शनिपेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.लोकसभा निवडणुकीची धामधूम जशी वाढत तशा आचारसंहिता भंगाच्या तक्रारीदेखील वाढत आहे. यात काही तक्रारींची चौकशी करून त्यांचे निवारण केले जात आहे तर काही तक्रारींमध्ये आचारसंहिता भंग होत असल्याचे सिद्ध झाल्यास गुन्हेही दाखल केले जात आहे. अशाच प्रकारे जळगाव येथील राहुल कांतीलाल तिवारी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन तीन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या तक्रारीत तिवारी यांनी म्हटले आहे की, ९ ते ११ एप्रिल दरम्यान प्रताप भोसले यांनी सोशल मीडियावर जळगाव लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्याविषयी बदनामीकारक पोस्ट केलेल्या आहे.या द्वारे आचार संहितेचा भंग होत असल्याचे तिवारी यांचे म्हणणे आहे. त्यानुसार शनिपेठ पोलीस ठाण्यात प्रताप यांच्याविरुद्ध कलम १२३ (४)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशाच प्रकारे दुसऱ्या तक्रारीनुसार मनीष सैंदाणे व इतरांनी तसेच तिसºया तक्रारीनुसार चैतन्य देशमुख यांनीदेखील सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याचे म्हटले आहे. त्यानुसार या दोघांविरुद्धही शनिपेठ पोलीस ठाण्यात कलम १२३ (४)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पूर्वी जळगाव मतदारसंघात चार आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर रावेर मतदारसंघात पाच तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यात रावेर मतदारसंघात विनापरवानगी भाजपचा प्रचार करण्यासाठी वाहन वापरल्याप्रकरणी मलकापूर येथे तर भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला आहे.
बदनामीकारक पोस्ट टाकल्याबद्दल जळगावात तीन गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:29 PM