लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या गणेशनगर भागातील रहिवाशांनी या भागात दोन सप्तपर्णी आणि एक कडुनिंब अशी तीन डेरेदार वृक्ष तोडले आहे. इलेक्ट्रॉनिक सॉ वापरून त्यांनी कमी वेळेत तीन वृक्ष तोडले आहे. याप्रकरणी मनपा सोमवारी परिसरातील व्ही. आर. चौधरी यांना नोटीस बजावणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस रहिवासी भागात वृक्षतोड सुरू असल्याची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेचे सचिव योगेश गालफाडे यांना मिळाली. गालफडे घटनास्थळी पोहचले. मात्र, इलेक्ट्रॉनिक सॉ वापरून अगदी कमी वेळेत ३ झाडे तोडून वृक्षतोड करणारे पसार झाले. मनपा अभियंता योगेश वाणी आणि कर्मचारी यांनी पंचनामा केला आहे.
योगेश गालफाडे यांनी दोषींवर गुन्हा दाखल करावा म्हणून मागणी केली तर कडुनिंबाच्या झाडावर पक्षांचा अधिवास असल्याने वन्यजीव अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पक्षीमित्रांनी केली आहे. या प्रकरणात मनपा सोमवारी व्ही.आर. चौधरी यांना तीन झाडे तोडल्याप्रकरणी दंड ठोठावणार असल्याची माहिती मनपाचे अभियंता योगेश वाणी यांनी दिली आहे.