जळगाव : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (जीएमसी) स्त्रीरोग विभागातील पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षातील चार विद्यार्थींनी व दोन विद्यार्थ्याची रॅंगिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात द्वितीय वर्षातील तीन विद्यार्थींनींनी २५ सप्टेंबर रोजी सहा जणांची रॅगिंग केल्याचे राष्ट्रीय हेल्पलाईनला ई-मेलव्दारे कळविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर जिल्हापेठ पोलिसांनी जीएमसीमध्ये येत पीडित विद्यार्थ्यांची चौकशी केली.
महिला पोलिसांसमोर तिघींचीही चौकशी
जीएमसीच्या अधिष्ठाता विभागाने पीडित विद्यार्थ्यांसोबत संपर्क साधला. गुरुवार सकाळी पीडित विद्यार्थींनींनी व दोन विद्यार्थ्यांनी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांची भेट घेऊन रॅगिंग विषयी माहिती दिली. यानंतर रॅंगिंग करणाऱ्या तीन विद्यार्थींनींना बोलविण्यात येऊन महिला पोलिसाच्यासमोर चौकशी करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.