जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वस्त धान्य दुकानांमधून पुढील तीन महिन्यांसाठी प्रती महिना प्रती व्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून यामध्ये जळगाव जिल्ह्यातील २४ लाख ६०४ लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. यात एकाच वेळी तीन महिन्यांचा तांदूळ मोफत मिळणार नाही, तर तो दर महिन्याला दिला जाणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उज्ज्वला गॅस योजनेच्या ग्राहकांना तीन महिने मोफत गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे. तसेच आता तीन महिने तांदूळदेखील मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला. यात उज्ज्वला योजनेंतर्गत जिल्ह्यातील दोन लाख ३९ हजार ८९५ लाभार्थ्यांना मोफत सिलिंडरचा लाभ मिळणार आहे तर मोफत तांदूळचा जिल्ह्यातील २४ लाख ६०४ लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. यात अंत्योदय योजनेतील एक लाख ३७ हजार ५४९ लाभार्थ्यांना तर प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत २२ लाख ६३ लाख ५५ लाभार्थ्यांना तीन महिने प्रती व्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत मिळणार आहे.स्वस्त धान्य दुकानांमधून एप्रिल आणि मे सोबत जूनचे धान्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने १९ मार्चला घेतला तसेच केंद्र सरकारकडून ३० मार्चला एप्रिल ते जून २०२० दरम्यान नियमित धान्यासोबतच प्रति महिना प्रति व्यक्ती ५ किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याचा निर्णय झाला. मात्र तीन महिन्यांचा अन्नधान्य साठा आणि तीन महिन्यांचा मोफत तांदूळ एकत्रितपणे उपलब्ध करून दिल्यास स्वस्त धान्य दुकानांमध्ये साठवणूक करणे जिकीरीचे होईल तसेच केंद्र सरकारने ३० मार्च रोजी मोफत तांदूळ देण्याच्या निर्णय घेतल्याने दोन दिवसात धान्याची वाहतूक करण्यासाठी मर्यादा असल्यामुळे त्या-त्या महिन्यामध्ये धान्य वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र शिधा पत्रिका (रेशन कार्ड) धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५ किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची केंद्र सरकारची सूचना आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र शिधा पत्रिका धारकाला त्याने नियमित अन्न धान्याची खरेदी केल्यानंतर प्रति व्यक्ती ५ किलो तांदूळ त्या-त्या महिन्यात मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील २४ लाख लाभार्थ्यांना मिळणार तीन महिन्याचे मोफत तांदूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 10:02 PM