वासेफ पटेल
भुसावळ : शहराजवळील साकेगाव येथील मूळ रहिवासी व सध्या भुसावळ येथील मोहीतनगरमध्ये राहणारे रेल्वे कर्मचार्यांसह पत्नी व दीड वर्षाच्या मुलगी यांचा साकेगाव रेल्वे कॅबिनजवळ रेल्वे अपघातातमृत्यू झाला. बुधवारी सकाळी नऊला ही घटना घडली.याबाबत सविस्तर माहिती अशी की, सन २०१७ मध्ये लग्न झालेले मूळचे साकेगाव येथील वाघोद गल्लीतील रहिवासी व रेल्वे कर्मचारी हरीश शिरीष चौधरी (३६), त्यांची पत्नी जयश्री (२७) आणि दीड वर्षांचा मुलगी गुंजन हे २ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास दुचाकी (क्रमांक एमएच-१९-६५११) ने रेल्वे लाईनच्या बाजूला कॅबिनजवळ लावून रेल्वेलाईन क्रॉस करत होते. तेव्हा अचानक आलेल्या रेल्वेने यातील जयश्री या गुंजन या दोघांचा मृत्यू झाला. ही घटना रेल्वे खांबा क्रमांक ४३८/२२ ए जवळ घडली. तर हरीश चौधरी यांचे दोन्ही पाय कापले गेले. त्यांना उपचारार्थ ॲम्बुलन्स घटनास्थळी आणावयास उशीर झाल्याने उपचारार्थ खासगी रुग्णालयात हलविण्यात थोडा उशीर झाला. यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.साकेगाव ग्रामस्थांचा आक्रोशघटनेची माहिती समजताच पूर्ण साकेगाव रेल्वे केबिनजवळ जमा झाले. ॲम्बुलन्स आणा, कुणीतरी जीव वाचवा अशी आरडाओरड घटनास्थळी सुरू झाली, मात्र साकेगावची ग्रामपंचायत मालकीची ॲम्बुलन्स गेल्या वर्षभरापासून नादुरुस्त असल्यामुळे व रेल्वेची ॲम्बुलन्स आणावयास उशीर झाल्याने उपचारादरम्यान हरीश चौधरी यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. घटनेमुळे साकेगावात प्रचंड शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने साकेगावात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. साकेगावची नादुरुस्त ॲम्बुलन्स त्वरित दुरुस्त करण्याची मागणीही यावेळी संतप्त स्वरात नागरिकांनी केली.तालुका व रेल्वे पोलीस घटनास्थळीघटनेची माहिती समजताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच रेल्वेचे पोलीस निरीक्षक दिनेश नायक हे अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह रेल्वे रूळावरून उचलण्यात आले. निरीक्षक पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, विजय पोहेकर यांनी तत्परता दाखवत ॲम्बुलन्सची व्यवस्था करून जखमी हरीशला उपचारार्थ रुग्णालयात हलविले.घटनास्थळावरून साहित्य जप्तदरम्यान, रेल्वे रुळावर अपघाती निधनानंतर तेथे त्यांचे काही साहित्य, सोन्याची अंगठी, फोटो, शासकीय कागदपत्र सापडले असून, ते पोलिसांनी जप्त केले आहे. मात्र यातून संशयास्पद कुठलीही चिट्ठी वगैरे मिळालेली नाही.दरम्यान हरीश हा यांचे वडील शिरीष वामन चौधरी यांच्या जागेवर रेल्वेत सेवेत लागला होता. काही वर्षांपूर्वी त्याच्या बहिणीचाही मृत्यू झाला होता. एकुलत्या एक हरीशच्या पश्चात रेल्वेतून सेवानिवृत्त झालेले वडील, आई असा परिवार आहे. पत्नी ही जळगाव येथील खोटेनगर भागातील माहेरवासी आहे.घटनास्थळी साकेगाव येथील संदीप चौधरी, अजय चौधरी, विनोद परदेशी, दिलीप पाथरवट यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी मदतकार्य केले. तसेच घटना घडताच रेल्वेचे मुकरदम आनंद गंगादिव यांच्या माहितीवरून रेल्वे कर्मचारी शेख गफूर शेख कालू, दीपक पाटील, भूषण बरहाटे यांनीसुद्धा घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.