जळगाव - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून, ऑक्टोबर महिन्यानंतर जिल्ह्यात सोमवारी कोरोना रुग्णांची संख्या शंभरी पार गेली आहे. त्यात जळगाव शहरात देखील रुग्णसंख्या वाढू लागली असून, जिल्ह्यात सध्या ५२० रुग्ण उपचार घेत आहेत. तर गेल्या दोन दिवसात जिल्ह्यासह जळगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने महापालिका स्तरावर उपाययोजना करण्यास पुन्हा सुरू झाली आहे. महापौर भारती सोनवणे यांनी मंगळवारी तातडीने मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरातील लग्नसमारंभ, पार्ट्या, मेळाव्यांबाबत कडक धोरण राबविण्याचा सूचना दिल्या आहेत. तसेच जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांनी बुधवारी महापालिकेत शहरातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिकांची बैठक घेऊन सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क लावण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. यासह महापालिकेतील रुग्णालयांमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा सूचनाही महापौरांनी दिल्या आहेत.
कोरोनाकडे दुर्लक्ष, सध्या उपचार घेतलेले रुग्ण ५२०
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या धोक्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे. त्या बेफिकिरीचा परिणाम कोरोनाच्या रुग्णसंख्येवर दिसून आला. ही रुग्णसंख्या सातत्याने वाढतच राहिली. सोमवारी तब्बल १२४ जास्त रुग्ण आढळून आले होते. ऑक्टोबर महिन्यानंतर प्रथमच एका दिवसात एवढी रुग्ण संख्या जळगाव जिल्ह्यात आढळून आली होती. या वाढत्या संख्येमुळे सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले रुग्ण हे ५२० आहेत.
मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसची परिसंवाद यात्रा जिल्ह्यात आयोजित करण्यात आली होती. त्यात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते मेळाव्यात जमले होते. संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. त्यात दोन मोठ्या बैठका जळगाव शहरातही पार पडल्या. त्याला शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. त्यावेळी तेथे कुणीही कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन केले नव्हते.
त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून शाळादेखील सुरू झाल्या आहेत. ११ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात ३७२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. तर हाच आकडा १६ फेब्रुवारी रोजी ५२० च्यावर पोहचला आहे.