जळगाव - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून, ऑक्टोबर महिन्यानंतर जिल्ह्यात सोमवारी कोरोना रुग्णांची संख्या शंभरी पार गेली आहे. त्यात जळगाव शहरातदेखील रुग्णसंख्या वाढू लागली असून, जिल्ह्यात सध्या ५२० रुग्ण उपचार घेत आहेत. तर गेल्या दोन दिवसात जिल्ह्यासह जळगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने महापालिका स्तरावर उपाययोजना करण्यास पुन्हा सुरू झाली आहे. महापौर भारती सोनवणे यांनी मंगळवारी तातडीने मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरातील लग्नसमारंभ, पार्ट्या, मेळाव्यांबाबत कडक धोरण राबविण्याचा सूचना दिल्या आहेत. तसेच जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांनी बुधवारी महापालिकेत शहरातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिकांची बैठक घेऊन सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क लावण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. यासह महापालिकेतील रुग्णालयांमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा सूचनाही महापौरांनी दिल्या आहेत.
लोकांचे व प्रशासनाचेही होतेय दुर्लक्ष
कोरोनाच्या संदर्भात बाळगावयाच्या दक्षतेकडे लोकांचे दुर्लक्ष होत असून बहुतांश नागरिक विनामास्क फिरताना दिसतात. तसेच राजकीय कार्यक्रम, लग्न समारंभांना लागू असलेल्या हजेरीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. शाळा, महाविद्यालये सुरू झाली असली तरीही सोशल डिस्टन्सिंग व इतर नियमांचे पालन नावालाच होताना दिसते. त्यामुळेच शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा वाढून २३३ वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यात दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आल्याने सक्रिय रुग्णसंख्या ५२०पर्यंत पोहोचली आहे.