जळगाव : - वरणगाव नगर परिषदेमध्ये लिपिक या पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सहा लाख रूपयांचा गंडा घातल्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गणेश जवरे (रा़ यशवंतनगर, भडगाव), निजानंद उर्फ आनंदा तुकाराम भंगाळे (रा़ आदर्शनगर, जळगाव) व डॉ़ सचिन शंकर चौधरी (रा़ रूईखेड, ता़ मुक्ताईनगर) या तिघांना अटक केली आहे़भुसावळ तालुक्यातील सुसरी येथील हेमंत मिलिंद पाटील यांच्यासह सचिन अशोक पाटील, मयुर रमेश पाटील, महेंद्र आनंदा बारोले यांना वरणगाव नगर परिषदेमध्ये लिपिक या पदावर नोकरी लावून देऊ असे सांगत गणेश जवरे, निजानंद भंगाळे, डॉ़ सचिन चौधरी, चंद्रकांत चिरमाडे या चौघांनी प्रत्येकाकडून दीड लाख रूपये घेतले होते़ त्यानंतर बनावट नियुक्ती पत्र दिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर हेमंत पाटील यांच्या फिर्यादीवरून नोकरीचे आमिष दाखवून सहा लाख रूपयांचा गंडा घातल्याप्रकरणी चौघांविरूध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक मंजितसिंग चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला होता़ या प्रकरणातील गणेश हा मुख्य सुत्रधार असून गेल्या अनेक दिवसांपासून चव्हाण हे त्याच्या मागावर होते़ मात्र, गुरूवारी मंजितसिंग चव्हाण यांना गणेश हा भडगाव येथे असल्याची माहिती मिळाली़ त्यांनी त्वरीत शफीक खान पठाण, राजेंद्र पाटील, सुनील सोनार, नितीन सपकाळे, किशोर काळे या पथकासह भडगाव गाठून गुरूवारी रात्री भडगाव येथून गणेश जवरे याला अटक केली़त्यापूर्वी निजानंद हा देखील जळगाव शहरात असल्याची माहिती मिळाल्यामुळे त्याला आधी अटक केली़ त्यानंतर शुक्रवारी सकाळी डॉ़ सचिन चौधरी यास देखील रूईखेडा येथून अटक केली़२० मार्चपर्यंत पोलीस कोठडीनोरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी अटकेतील तिघांना शुक्रवारी दुपारी मंजितसिंग यांनी न्यायालयात हजर केले़ सुनावणीअंती तिघांना २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ दरम्यान, तिघांची कसून चौकशी करण्यात येत असून आणखी काही लोकांना यांनी गंडा घातल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़
सहा लाखांचा गंडा घालणाऱ्या तीन जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:37 AM
नोकरीचे आमीष : फसवणूक झालेले तरुण सुसरीचे रहिवासी
ठळक मुद्दे२० मार्चपर्यंत पोलीस कोठडी