चाळीसगाव : तालुक्यातील हिंगोणे गावालगत असलेल्या तितूर नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक केल्याप्रकरणी संबंधितांविरुध्द कारवाईच्या मागणीसाठी हिंगोणे येथील ग्रामस्थांचे उपोषण सहाव्या दिवशीही सुरूच होते. यातील तीन उपोषकर्त्यांची बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास प्रकृती खालावली.उपोषणकर्ते बाळासाहेब गजमल पाटील, ज्ञानेश्वर महाजन, सुरेश पाटील यांनी सांगितले की, वाळूचोरी प्रकरणात तहसीलदारांना अनेक वेळा वाळूचोरीविषयी लेखी व तोंडी माहिती देवूनही त्यांनी टाळाटाळ केली. आम्ही त्यांच्याकडे माहिती देत होतो. त्यावेळी संबंधितांना ते फोन करुन देत असत, असेही आरोप त्यांनी केला. त्यामुळे महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी जाताच त्या आधीच वाळूचोरटे पसार व्हायचे असा प्रकार अनेकवेळा पहायला मिळाला. तहसीलदारांचा या प्रकरणात संबंध होता तसेच माजी सरपंच तुषार रावण चव्हाण हे संबंधितांचे हस्तक असल्याचा आरोप करीत त्यादिशेने पोलीसांनी तपास करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.७० ते ७५ ब्रास हजार वाळू नदीपात्रातून चोरी जावूनदेखील पंचनाम्यात फक्त ३ हजार ब्रास वाळूची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वाळूचोरीचा फेरपंचनामा करुन इतर सक्षम अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात यावी, दंडात्मक कारवाईची जबाबदारी प्रभाकर चौधरी यांच्यावर निशिचत करावी व त्यांच्याविरुध्द एमपीडीअन्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी उपोषणकर्त्यांची आहे. त्यासाठी सहा दिवसांपासून उपोषण सुरूच आहे. बुधवारी उपोषणस्थळी अॅड. साहेबराव पाटील, अॅॅड. सुभाष खैरनार, अॅॅड. राहुल पाटील यांनी भेट दिली.यांची प्रकृती खालावलीसहा दिवसांपासून उपोषण सुरू असल्याने बुधवारी हिंगोणे खुर्दचे उपसरपंच अरविंद भिमराव चव्हाण, दिलीप रामचंद्र पाटील व एकनाथ नामदेव कोष्टी या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालवली. या सर्वांना चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चाळीसगाव तालुक्यातील उपोषणकर्त्या तिघांची प्रकृती खालवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 11:46 PM