जळगाव : यावल तालुक्यातील वन विभागातील वृक्षतोड प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली होती. हे तिघेही जण पोलीस ठाण्याच्या आवारातून पसार झाले. ही घटना यावल येथे बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. बिलालसिंग पावरा, प्यारासिंग पावरा आणि सुरेश पावरा अशी या पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत. यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतातील पूर्व वन विभागाच्या पेझरपाळा या वनक्षेत्रात अवैधरित्या वृक्षतोड करीत असताना या तीनही जणांना बुधवारी दुपारी अटक करण्यात आली होती.
यानंतर यावल येथील ग्रामीण रूग्णालयात सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आरोपींची आरोग्य तपासणी करण्यात आली. तिथून त्यांना पोलीस ठाण्यात आणले असता आरोपींनी पळ काढला. यावल वन विभागाच्या पूर्व क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांनी घटनेस दुजोरा दिला आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी वनविभागाचे पथक सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रात रात्रीच पाठवण्यात आले आहेत. गुरूवारी सायंकाळपर्यंत आरोपींना पकडण्यात वनविभागास यश आलेले नव्हते. फरार आरोपींविरूद्ध दुसरा गुन्हा दाखल करण्यात येत आहे, अशी माहिती विक्रम पदमोर यांनी दिली.