बोदवड जि. जळगाव : शेती उताऱ्यावर लावलेल्या नावाचा पुरावा देण्यासाठी काढण्यात आलेली नोटीस रद्द करण्यासाठी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाकडून दोन लाख रुपयांची लाच घेणारा बोदवड येथील तहसीलदार हेमंत भागवत पाटील (४०, रा.भराडी ता. जामनेर) याच्यासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही धडक कारवाई केली.बोदवड येथील मंडळ अधिकारी संजय झेंडू शेरनाथ, (४७, रा. भुसावळ) आणि तलाठी नीरज प्रकाश पाटील (२४, रा. बोदवड) यांचाही अटक करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे.फैजपूर येथील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक यांनी पत्नीच्या नावे सन-२००२ मध्ये कुऱ्हा हरदो ता. बोदवड शिवारात शेती घेतली होती. कालांतराने या शेतीच्या उताऱ्यावर मुळ मालकाचे नाव आले. यावर तक्रारदार यांनी उताऱ्यावर त्यांच्या पत्नीचे नाव लावले. त्याप्रमाणे त्यांना उताराही देण्यात आला. या उताऱ्याबाबत बोदवड तहसीलदार हेमंत पाटील यांनी हरकत घेतली आणि पुरावा देण्याबाबत नोटीस बजावली. ही नोटीस रद्द करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. यानंतर दोन लाख रुपयांवर तडजोड झाली.
दरम्यान, तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. बुधवारी दुपारी यासाठी सापळा लावण्यात आला होता. मात्र तो हुकला. यानंतर शुक्रवारी दुपारी या तीनही जणांना तहसील कार्यालय परिसरात दोन लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.या कारवाईनंतर चंद्रकांत सोसायटीमधील तहसीलदार हेमंत पाटील यांच्या घराची झडतीही
घेण्यात आली.