लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : पाटणादेवी अभयारण्यमधील पथिकाश्रम येथील जुन्या नर्सरीतील काही जिवंत झाडांची इलेक्ट्रिक कटरच्या सहाय्याने कत्तल केली व दुसऱ्या दिवशी ट्रॅक्टर ट्रॉलीच्या सहाय्याने पिंपरखेड येथील एका लाकूड व्यापारास रुपये तीस हजारास विकली होती. याप्रकरणी पाटणादेवी येथील वनरक्षक प्रविण गवारे, वनमजूर जगन मोरकर व वनमजूर रामचंद्र पाटील या तिघांविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनच्या संबधित अधिकाऱ्यांनी याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) नागपूर तसेच अपर प्रधान मुख्य संरक्षक पश्चिम विभाग मुंबई, विभागीय वनअधिकारी औरंगाबाद तसेच राजेश ठोंबरे मानद वन्यजीव रक्षक जळगाव यांच्याकडे ही तक्रार सादर केली होती. यात वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील विविध कलमांनुसार संरक्षित अभयारण्य क्षेत्रात असे कृत्य करणे हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचे उघड झाले होते. या गुन्ह्यामध्ये वापरलेले ट्रॅक्टर, ट्रॉली सह इलेक्ट्रॉनिक कटर मशीन, करवत, कुऱ्हाड जप्त करूनहे साहित्य सरकारजमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.