ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.10- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील 24 पैकी तीन महत्त्वाची रेल्वे स्थानके पूर्णपणे डिजिटल झाली आहेत. या स्थानकावर प्रवाशांना सर्व सोयी डिजिटल पद्धतीने दिल्या जात आहेत.
भुसावळ विभागातील ए-1 श्रेणीतील नाशिकरोड रेल्वे स्थानक, ए श्रेणीतील भुसावळ आणि याच श्रेणीतील अमरावती रेल्वे स्थानक अशी तीन रेल्वे स्थानके पूर्णपणे डिजिटल झाली आहेत.
रेल्वेच्या भुसावळ विभागातील भुसावळसह 11 रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांना आता मोबाईल अॅपवरुन प्रवासाचे अनारक्षित तिकिट जारी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
वापर वाढला
प्रवाशांनी डिजिटल होऊन रेल्वे सेवेचा वापर वाढविला आहे. मोबाईल अॅपवरुन तिकिट मिळविण्यासाठी प्रवाशांना काही तांत्रिक अडचण येत असल्यास त्यांनी दूरध्वनी क्रमांक 138 वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग प्रवाशांच्या सोयीसाठी सतत अग्रेसर आहे. प्रवाशांना जास्तीत जास्त सोयी-सुविधा देण्यावर या विभागाचा भर असल्याची माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी ‘लोकमत’ला दिली. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ डिजिटल इंडिया’ला अनुसरुन भुसावळ रेल्वे विभागाने प्रवाशांसाठी असलेल्या सोयींमध्ये आधुनिकीकरण आणले आहे. प्रवाशांना आता मोबाईल अॅपवरुन तिकिटाची सोय करुन देण्यात आली.
नाशिकरोड, भुसावळ,अमरावती या व ए-1 व ए श्रेणीतील स्थानकांवरील तिकिट विक्री कार्यालय, पार्सल, माल धक्क, आरक्षण कार्यालयात पीओएस (स्वाईप) मशीन बसविण्यात आली. खाद्य पदार्थाचे स्टॉल, बूक स्टॉल, चार पायांचे स्टॉल या ठिकाणी पेटीएम, मोबीक्वीकची सोय उपलब्ध करुन देण्यात आली. पेटीएम, मोबीक्वीक, पीओएस मशिनच्या सहाय्याने अनारक्षित तिकिट काढणे, सामान बूक करणे, मालवाहतूकीचे भाडे अदा करणे आदी आर्थिक डिजिटल करण्यात आले.
भुसावळ रेल्वे विभाग प्रवाशांचे हित जोपासत आहे. डिजिटल इंडियाचे प्रतिबिंब रेल्वेत दिसत आहे. स्वाईपसह पेटीएम, मोबीक्वीक, पीओएस मशीनीचा वापर प्रवाशांकडून केला जात आहे.प्रवाशी मोबाईल अॅपचा वापर करीत आहेत.
-सुनील मिश्रा,
वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, डीआरएम कार्यालय, भुसावळ.