पाचोरा : शहरात जोरदार पावसाने व्ही.पी. रोडवरील तीन मजली इमारत सोमवारी २० रोजी रात्री १०च्या सुमारास पत्त्यासारखी कोसळल्याची घटना घडली. इमारत धोकादायक असल्याने, पालिकेने येथे राहणाऱ्यांना दोन दिवसांपूर्वीच बाहेर काढल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शहरातील बाहेरपुरा भागात गेल्या पाच वर्षांपूर्वी ही इमारत बांधली होती. मात्र, काही तांत्रिक दोष राहिल्याने ही इमारत कोसळली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. शहरातील व्हीपी रोडवर मुंबईनिवासी असलेल्या साजेदाबी शेख खलील यांनी पाचोरा येथे इन्व्हेस्टमेंट म्हणून तीन मजली इमारत सुमारे पाच वर्षांपूर्वी बांधली होती. मात्र, या इमारतीला पावसाने तडा पडला होता, म्हणून येथे असलेले भाडेकरू यांनी इमारत रिकामी केली होती.
सोमवारी सायंकाळी जोरदार पावसाने रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही इमारत अचानक कोसळली सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. यापूर्वी नगरपरिषदने हा रोड बंद केला होता. परिसरातील आणि शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी काळजी घेतल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सदर इमारत ५ वर्षांपूर्वी आरसीसी केले होते. बांधकाम करतेवेळी पाया २ ते अडीच फूटच खोदलेला असल्याचे दिसून येते. त्यातच इमारत ही तीन मजली बांधकाम केल्याने, पाहिजे तसे तंत्रज्ञान न वापरता केल्याचे दिसून येते.
भाडेकरूचे स्थलांतर
शे मुबारक शे महेबूब हे गॅरेजवर मजुरीचे काम करून, सदर इमारतीत ताबेगहान म्हणून रहिवास करीत होते. फेब्रुवारी, २१ पासून रहिवासासाठी दोन लाख देऊन त्यांनी ही इमारत ताब्यात घेतली होती. इमारतीची स्थिती पाहता, रविवारी नगरपालिकेने सक्तीने सूचना करून त्यांना बाहेर काढले. सदर इमारत हळूहळू खचत असल्याचे शेजारील शे अल्ताब शे अहमद व सागर यांनी नगरपालिका प्रशासनाला सूचित केले होते. तातडीने मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून, संबंधितांना नोटीस देत, घर खाली करण्यास सक्ती केली. परिसरातील रस्ता दोन्ही बाजूने बंद केला. यामुळे रविवारीच शे मुबारक या भाडेकरूने घर रिकामे केले होते, म्हणून त्यांच्या कुटुंबातील ८ जणांचे प्राण वाचले. इमारत पत्त्यासारखी कोसळली, तेव्हा शे मुबारक यांनी दैवा बलवत्तर असल्यामुळेच वाचल्याचे सांगितले.
शेजारीच नव्याने बांधकाम सुरू
दरम्यान, सदर इमारत शेजारी शे अब्युस अल्लाउद्दीन यांचे बांधकाम काही दिवसांपूर्वीच परवानगी न घेता सुरू केल्याचे दिसून येते. हे बांधकाम करताना सदर बांधकाम कारागीर शे वाहेद शेे रशीद यांनी सदर पडलेल्या इमारतीच्या पायाला धक्का लागेल की नाही, याकडे दुर्लक्षच केल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. त्यामुळेही इमारतीच्या या पायाला इजा पोहोचली असावी, असा अंदाज काहींनी व्यक्त केला.
प्रतिक्रिया-
दोन दिवसांपूर्वीच या इमारतीची माहिती मिळताच, पालिकेने हालचाली केल्या. परिसर सीलबंद करून, सदर इमारत रिकामी केली. त्या रहिवाशांचे अन्यत्र तात्पुरते स्थलांतर पालिकेच्या गाळ्यांमध्ये केले आहे. इमारत पडणार, याची पूर्व कल्पना असल्याने व पालिकेने लक्ष दिल्याने जीवित व वित्तहानी टळली. शहरातील अन्य धोकादायक इमारती मालकांना नोटिसा दिल्या असून, इमारती रिकाम्या करण्यास सूचित केले आहे.
- शोभा बाविस्कर, न.पा. मुख्याधिकारी पाचोरा.