जळगाव : यंदा पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे. हिवाळ्यातच अनेक तालुक्यांमधील गावांमध्ये प्रचंड पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत पाण्याचे महत्त्व नागरिकांना पटू लागले असून, त्यामुळे तालुक्यातील आव्हाणे, खेडी व फूपनगरीच्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून गिरणा नदीवर तीन बंधारे उभारून गिरणा नदीचे पाणी अडविले आहे. विशेष म्हणजे गिरणा नदीतून वाळूची चोरटी वाहतूक थांबविण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.सात गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटलागिरणा नदीच्या पाच किमीच्या अंतरामध्येतच तीन बंधारे तयार केल्याने नदीचे लाखो लीटर पाणी जमा झाले आहे. त्यामुळे भूजल पातळीतदेखील वाढ होणार असून, उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामाना करावा लागणार नाही. खेडी, आव्हाणे व फुपनगरी तीन गावांसह धरणगाव तालुक्यातील आव्हाणी, दोनगाव, भोकणी व जळगाव तालुक्यातील वडनगरी या गावांच्यादेखील पाण्याचा प्रश्न यामुळे सुटणार आहे. सात गावांमधील तब्बल २० हजारहून अधिक नागरिकांना यामुळे फायदा होणार आहे.‘देर आये, दुरुस्त आये’आव्हाणे, खेडी व फुपनगरी हे तीन गावातील गिरणा नदीपात्रातून दरवर्षी बेसुमार वाळू उपसा होतो. यामुळे भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात खालावली आहे. केळीसाठी प्रसिध्द असलेल्या गावांमध्ये गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्यात कूपनलिका आटतात. यामुळे केळीची लागवडदेखील कमी होत आहे. तसेच काही गावांमध्ये पिण्याचा पाण्याचादेखील प्रश्न निर्माण होऊ लागल्याने उशिरा का होईना ग्रामस्थांना गिरणानदीचे महत्त्व कळले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी गिरणा धरणातून काही दिवसांपूर्वी सोडलेले गिरणेच्या आवर्तनाचे पाणी अडविण्याचा निर्णय घेतला व पंधरा दिवसाच्या तीनही गावांनी आपआपल्या गिरणाकाठावर मातीचा बंधारा तयार केला आहे.बंधारा तयार करण्यासाठी गावातील प्रत्येक नागरिकाने श्रमदान केले. तसेच भविष्यात देखील प्रशासन किंवा ग्राम पंचायतीची मदत न घेता गावाच्या हितासाठी एकत्र येवून काम करण्याचा निर्धार या तीनही गावातील नागरिकांनी केला आहे.प्रशासनाची मदत न घेता उभारले बंधारेगिरणानदी लगत गेल्या चार वर्षांपासून सात बलून बंधारे मंजूर झाले आहेत. मात्र, आतापर्यंत कोणतीही तयारी शासनाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे या तीन गावांमधील शेतकऱ्यांनी प्रशासन व शासनाची कोणतीही मदत न घेता हे बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला. दिवाळीत गिरणेचे आवर्तन सोडण्यात आले. त्यामुळे हे पाणी अडविण्याची आवश्यकता असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.फुपनगरीच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन प्रथम आपल्या गावातील नदीपात्रात बंधारा बांधला. केवळ तीन दिवसात हा बंधारा बांधून तयार झाला. त्यानंतर खेडीच्या ग्रामस्थांनी बंधारा तयार केला. या दोन गावांनी बांधलेला बंधारा पाहून आव्हाणेतील शेतकºयांनीदेखील बैठक घेतली व बंधारा बांधण्याचा निर्णय घेतला.प्रत्येक गावातील जे मोठे बागायतदार शेतकरी होते. त्यांच्याकडून पाच हजार रुपये घेण्यात आले तर इतर शेतकºयांकडून अडीच हजार रुपये घेण्यात आले. तसेच ग्रामस्थांनी स्वखुशीने १ ते ५ हजार रुपयांची मदत केली. तसेच काही शेतकºयांनी माती आणून देण्याचा प्रस्ताव दिला तर काहींनी बंधाºयाच्या बांधकामासाठी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले.‘गिरणा’ची दुर्दशा थांबवण्याचा संकल्पगिरणा नदीतून वाळू उपशामुळे गिरणा नदीला बकाल स्वरुप प्राप्त झाले आहे. ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून, वाळूचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे भविष्यात या तिनही गावांनी आपल्या नदी पात्रातून वाळू उपसा होऊ न देण्याचा संकल्प केला आहे. तसेच यासाठी प्रशासनाची कोणतीही मदत न घेता ग्रामस्थच पुढाकार घेणार आहेत.
लोकसहभागातून आव्हाणेसह तीन गावांनी ‘गिरणा’वर उभारले बंधारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:28 PM
पाणी टंचाईवर उपाय योजना
ठळक मुद्देवाळूचा उपसा केल्यास खबरदार; ग्रामस्थांचा निर्धार‘गिरणा’ची दुर्दशा थांबवण्याचा संकल्प