जळगाव : दुचाकीवरुन तीन सीट जाणाऱ्या तरूणांना थांबवून दंड भरण्याच्या सूचना केल्याचा राग आल्याने तिघं तरुणांनी महिला वाहतूक पोलीस सुनीता पाटील यांच्याशी हुज्जत घालून ई चलन डिव्हाईस मशीन हिसकावून घेतल्याचा प्रकार गुरूवारी दुपारी पुष्पलता बेंडाळे चौक परिसरात घडला. याप्रकरणी मोहन बडगुजर (रा.पांझरापोळ टाकीजवळ) मनोज सुधाकर चौधरी (रा.विठ्ठलपेठ) या दोघांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक शाखेच्या कर्मचारी सुनीता पाटील व ट्रॅफिक वार्डन उमेश ठाकूर यांची गुरुवारी बेंडाळे चौक येथे ड्युटी होती. दुपारी १२.३० वाजता दुचाकीवरुन (क्र.एम.एच. १९ डी.ई. ४४४५) तीन सीट जाणाºया तरुणांना थांबविले.दुचाकीस्वार मोहन बडगुजर याला दंड भरण्याच्या सूचना केल्या. तसेच परवान्याची विचारणा केली असता त्याच्याकडे तोही नव्हता.तीन सीट बाबत विचारणा केल्याच्या राग आल्याने दोघांनी आरडाओरड करुन गोंधळ घातला नंतर सुनीता पाटील यांनी दुचाकीचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या हातातील डिव्हाईस मशीन जबरीने हिसकावून त्याच्या खिशात घातले.मनोज याने आम्ही कोणत्याही प्रकारे दंड भरणार नाही, या शब्दात तरुणांनी महिला पोलिसाला सुनावले.या वादानंतर दोघांना शहर वाहतूक शाखेत आणण्यात निरीक्षक देविदास कुनगर यांची तिघांची चौकशी केली. त्यानंतर सुनीता पाटील यांच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलिसात मोहन बडगुजर, मनोज चौधरी या दोघाविरोधात जबरी लूट, शासकीय कामात अडथळा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
महिला वाहतूक पोलिसाशी तीन तरुणांनी घातली हुज्जत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:02 PM