वाकोद, ता.जामनेर, फर्दापूर, ता. सोयगाव : मान्सूनपूर्व पावसासह चक्रीवादळाने शनिवारी सायंकाळी (दि.3) तुफान थैमान घालत कुंभारी, ता. जामनेर तसेच फदार्पूरसह ठाणा, वरखेडी खुर्द परिसराला जबरदस्त तडाखा दिला. वादळाच्या या तडाख्यात कुंभारी व ठाणा या गावातील शंभरपेक्षा जास्त घरांवरील पत्रे उडून त्यावर ठेवण्यात आलेले दगड घरात कोसळल्याने अनेक जण जखमी झाले. तर अनेक घरातील टीव्ही, मिक्सर, पंखे, कुलर आदी विद्युत उपकरणांसह संसारोपयोगी साहित्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळामुळे कुंभारी, ठाणा व वरखेडी खुर्द शिवारात सुमारे 50 विजेचे खांब व अनेक मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत. या गावांतील नागरिकांचे वादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शनिवार व रविवार हे दोन्ही दिवस जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. सुदैवाने जीवितहानी टळली आहे. शनिवारी सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास कुंभारीसह फदार्पूर, ठाणा, वरखेडी खुर्द परिसरात वादळी वा:याला सुरुवात झाली. यात वरखेडी खुर्द शिवारातील गट क्रमांक 28 मधील उत्तम साळवे यांच्या शेतातील घरावरील पत्रे उडून पत्र्यावरील दगड घरात कोसळल्याने जिजाबाई उत्तम साळवे, उत्तम साळवे, अण्णा नाना साळवे (रा.फदार्पूर) हे तिघे जण जखमी झाले. यापैकी जिजाबाई व उत्तम साळवे हे दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.ठाण्यात 50 घरांवरील पत्रे उडाली दरम्यान, याचवेळी ठाणा (ता. सोयगाव) या गावातही वादळाने हाहाकार माजवण्यास सुरुवात केली. गावातील पन्नासच्या वर घरावरील पत्रे उडून त्यावरील दगड घरात कोसळल्याने सुनील मगरे (35), भिवसन नप्ते (55), सायली संजय मगरे (13), सुजल सुनील मगरे (8), खंडू मगरे, किरण मगरे, मालती देवीदास लोखंडे, सुनीता ज्ञानेश्वर म्हस्के हे जखमी झाले. त्यांच्यावर फर्दापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, ठाणा गावशिवारातील गट क्रमांक 72 मधील गणेश काळे यांच्या शेतात विद्युत खांब कोसळून त्यांच्या ठिबक सिंचन संचाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळी वा:याच्या तडाख्यात वरखेडी खुर्द व ठाणा शिवारात अनेक विद्युत खांब कोसळून महावितरणचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. याच शिवारातील अनेक शेतक:यांच्या बखारीही उद्ध्वस्त होऊन शेतातील मोठमोठे वृक्ष उन्मळून पडून मोठय़ा प्रमाणात वनसंपदेचे नुकसान झाले आहे. दरम्यान, वादळामुळे झालेल्या या सर्व नुकसानीचे त्वरित पंचनामे करून प्रशासनाने आपद्ग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.शेकडो घरांवरील पत्रे उडाली : विजेच्या खांबांसह मोठे वृक्ष उन्मळले, दगड लागल्याने 11 जण जखमी, लाखोंचे नुकसान, जनजीवन विस्कळीतकुंभारी बुद्रूक येथे शनिवारी सायंकाळी 6 वाजेनंतर विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आणि त्याचवेळी वादळी वारादेखील वाहू लागला. या वादळी वा:याने पाहता पाहता उग्र रूप धारण केल्याने त्याचे रूपांतर चक्रीवादळात झाले. 10 ते 15 मिनिटे चक्रीवादळ घोंगावले. त्यामुळे गावातील घरावरील पत्रे उडायला सुरुवात झाली. तसेच घरासमोर असलेली मोठी झाडे कोसळायला लागली. लोक आपला जीव वाचवण्यासाठी शेजारच्या घरांचा सहारा घेण्यासाठी धावाधाव करायला लागल्याने एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले. लोकांनी वेळीच सुरक्षित जागेचा आश्रय घेतल्याने जीवितहानी टाळली. अनेक घरांचे मात्र मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. त्यात पंचायत समिती सदस्य हिरामण जोशी यांच्या दोन मजली इमारतीवरील संपूर्ण पत्रे झाडांच्या पानासारखी उडून गेली. तसेच गावातील 50 टक्के घरावरील पत्रे उडाली. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही. गावाबाहेरील मोरे वस्तीतील 10 घरांवरील पत्रे उडाल्याने व पावसाने घरातील सामानाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. हवेचा जोर इतका होता की गावातील घरांवरील उडालेली पत्रे गावाबाहेर शेतात 1 ते 2 किलोमीटर अंतरावर पडलेली होती. वादळ शांत झाल्यानंतर सर्वत्र पत्रे पडलेली दिसत असल्याने लोकांनी जमा केली. या चक्रीवादळामुळे गावक:यांमध्ये भीतीचे वातावरण असल्यामुळे रात्रभर लोक झोपू शकले नाही. चक्रीवादळात विजेच्या तारा तुटल्याने रात्रभर वीज बंद होती. गावातील पाणीपुरवठा योजनेची डीपीदेखील पडली. तिला पुरवठा करणारे वीज वाहक पोल 20 ते 25 ठिकाणी जमीनदोस्त झाले होते. प्रभाकर साळवे यांच्या कंपनीची पत्रे उडाल्याने इलेक्ट्रॉनिक मशीनरीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, जामनेरचे तहसीलदार यांना माहिती मिळाल्याने नायब तहसीलदार परमेश्वर कासुडे, जे. के. चव्हाण विस्तार अधिकारी लोखंडे यांनी गावातील नुकसानीची पाहणी करण्यात येऊन तलाठय़ास पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
फर्दापूर, कुंभारी परिसरात वादळाचे थैमान
By admin | Published: June 05, 2017 1:28 AM