अमळनेर : सायंकाळी ५ ते सकाळी ५ पर्यंत संचारबंदी कडक करा आणि दिवसा जमावबंदी आदेशाची कडक अंमलबाजवणी करण्याचे आदेश प्रांताधिकारी तथा इंसिडन्ट कमांडर सीमा अहिरे यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.
जळगाव जिल्ह्यात त्यात जवळच पारोळा तालुक्यात ‘डेल्टा प्लस’चे रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले असून जिल्हाधिकाऱ्यांनी काही निर्बंध लावले आहेत. त्यासाठी आदेशाची कडक अंमलबाजवणी होण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. शनिवारी व रविवारी जनतेच्या सहकार्याने किराणा आणि भाजीपालादेखील बंद ठेवा, तसेच दुकानांवर पडदे लावले नाहीत तर त्यांनाही दंड लावा, विनामास्कची कारवाई वाढवा, असेही अहिरे यांनी बैठकीत सांगितले.
लग्नसमारंभ आणि अंत्ययात्रेबाबत ग्रामीण भागात नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे तेथे पोलीस पाटलांवर जबाबदारी देण्यात येणार आहे. हॉटेल, जिम, क्रीडांगणात गर्दी होणार नाही, यासाठी दक्ष राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
या बैठकीस तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, मारवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल फुला, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, प्रशासन अधिकारी संजय चौधरी हजर होते.