जळगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी न करता आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विवाह सोहळ्यांचे आयोजक (वधू पिता) व मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापकांविरुध्द रविवारी शहरातील एमआयडीसी, रामानंद नगर व जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. विवाह समारंभात ५० पेक्षा जास्त लोक बोलावून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द कारवाईचा बडगा उगारला आहे.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत व पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे दोन्ही अधिकारी रस्त्यावर उतरले होते होते. एमआयडीसीतील श्रीकृष्ण लॉन्स, बालाणी लॉन, ढाकेवाडी येथील मुक्तांगण हॉल, तसेच रामानंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतील शानबाग मंगल कार्यालय, रॉयल पॅलेस, लाडवंजारी मंगल कार्यालय, जिल्हा पेठ हद्दीतील दापोरेकर मंगल कार्यालय, यश लॉन यांच्यावर कारवाई करण्यात येऊन व्यवस्थापकासह वधू-वर मंडळींकडील आयोजकांवर गुन्हे दाखल केले आहे. एमआयडीसील तडवी समाज मंगल कार्यालय, गुंजन साईलीला, जैस्वाल, मैत्रेय हॉटेल, प्रेसिडेंट, अजिंठा, शेख इकबाल हॉल आदी ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले.
यांच्यावर झाली कारवाई
बालाणी लॉन येथील लग्न समारंभाचे आयोजक भूषण सुभाष हंसकर (वय २५, रा. शनिपेठ) व्यवस्थापक अमोल भरत पाटील (रा. रामेश्वर कॉलनी), मुक्तांगण हॉल येथील लग्न समारंभाचे आयोजक राजेंद्र ओंकार महाजन (वय ४५, रा. वंजारी खपाट, ता. धरणगाव) व व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला.
श्रीकृष्ण लॉन येथील आयोजक अनिल शांताराम चौधरी (वय ५०, रा. दहिगाव, ता. यावल), व्यवस्थापक भिका सदाशिव बडगुजर (वय ४६, रा. कढोली, ता. एरंडोल) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
यांनी केली कारवाई
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांच्यासह पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, तुकाराम निंबाळकर, ललित गवळे, इम्रान सय्यद, गोविंदा पाटील, तुषार गिरासे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक बडगुजर यांनी रॉयल पॅलेस येथे तर सहायक संदीप परदेशी यांनी शानभाग व लाडवंजारी मंगल कार्यालयावर कारवाई केली.
काय केली कारवाई
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी असलेल्या उपाययोजनांचा अवलंब न करता सरकारी आदेशाची अवहेलना करून सार्वजनिक उपद्रव केला म्हणून भादंवि कलम १८८, २६९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.