गणेश कॉलनीतील घटना : भाजीपाला घेण्यासाठी गेल्या होत्या वृध्दा
जळगाव : आजी तुम्हाला तो मुलगा बोलावतो आहे, असे सांगून एका तरुणाने कुसुमबाई भास्कर वाणी (वय 78 रा.गणेश कॉलनी, जळगाव) या वृध्द महिलेजवळील 50 हजार रुपये किमतीची दोन तोळ्याची सोन्याची पोत व पाकिटातील 300 रुपये लांबविल्याची घटना सोमवारी दुपारी 12 वाजता गणेश कॉलनीत घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश कॉलनी येथील प्लॉट नंबर 93 मध्ये कुसुमबाई भास्कर वाणी या पती, सून व नातवंडे यांच्यासह राहतात. कुसुमबाई या नेहमी सायंकाळी भाजीपाला खरेदी करण्यासाठी जातात मात्र सोमवारी दुपारी 12 वाजता ते गणेश कॉलनी रिक्षा स्टॉप परिसरात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेल्या. भाजीपाला खरेदी केल्यानंतर इलेक्ट्रीक डिपीजवळ उभा असलेला एक लाल रंगाचा लायनिंगचा शर्ट व निळ्या रंगाची पॅँट परिधान केलेला 30 ते 35 वयोगटातील तरुण वृध्द महिलेकडे आला व आजी तो मुलगा तुम्हाला बोलावत आहे असे सांगून त्यांचा हात धरुन पुढे घेऊन गेला.
गळ्यातील पोत काढण्याचा सल्ला
गळ्यातील सोन्याची पोत काढून पिशवीत ठेवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार वाणी यांनी पोत पिशवीतील पाकीटात ठेवली. नंतर या पिशवीला मी गाठ मारून देतो असे म्हणत त्यांच्याजवळील स्वत:च्या हातात घेतली व बोलण्यात गुंतवून पिशवीतील ते पाकिटच गायब केले.दरम्यान, संशयित तरुण तेथून निघाल्यानंतर वृध्द महिलेने पिशवीतील पाकीट पाहिले असता ते मिळून आले नाही. त्यातील 300 रुपये रोख व दोन तोळ्याची सोन्याची पोत गायब झाली.
दरम्यान, कुसूमबाई वाणी यांनी नातेवाईकांना सोबत घेऊन दुपारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठले व झाल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. वाणी यांनी दिलेल्या वर्णनावरुन पोलिसांनी चोरटय़ाचा शोध घेतला तसेच रस्त्यावरील काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी तपासले. मात्र हाती काहीच लागले नाही. संशयित तरुणासोबत आणखी एक जण असल्याचा संशय आहे.